लठ्ठपणा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर गुंतागुंतीचे प्रमाण वाढत असतानाच लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेला विम्याचे संरक्षण मिळणे मात्र सोपे नसल्याचेच दिसून येत आहे. लठ्ठपणासाठीची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रुग्णांना विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कंपन्यांशी चक्क भांडावे लागत आहे. भांडून आणि पाठपुरावा करूनही बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी विमा संरक्षण मिळवणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्यच असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
अजूनही या शस्त्रक्रियेस सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रिया (कॉस्मेटिक सर्जरी) समजले जात असल्याचे निरीक्षण बॅरिएट्रिक सर्जन डॉ. उत्क्रांत कुर्लेकर यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘‘लठ्ठपणाबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वास घ्यायला त्रास होणे, हृदयविकार, गुडघ्यांवर वजनाचा भार पडणे अशा इतर गुंतागुंतींना सुरुवात होते तेव्हा लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करून घेण्यास सुचवले जाते. हृदयशस्त्रक्रिया किंवा कृत्रिम गुडघारोपणाच्या शस्त्रक्रियेला विमा संरक्षण मिळते, पण त्यासाठी कारणीभूत ठरलेला लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेला मात्र ‘कॉस्मेटिक सर्जरी’ ठरवले जाते. पाठपुरावा करून व भांडून देखील एखाद्याच रुग्णाला लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी विमा संरक्षण मिळत असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने देखील लठ्ठपणा हा एक ‘क्रोनिक’ आजार असल्याचे मान्य केले आहे.’’
‘ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीहरी ढोरे पाटील म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेतर्फे आम्ही २००३ पासून लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी विमा संरक्षण मिळण्याची मागणी करत आहोत. गेल्या १० वर्षांत ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. ६ महिन्यांपूर्वी या शस्त्रक्रियेचा ‘सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम’ (सीजीएचएस) मध्ये समावेश करण्यात आला. असे असले तरी या योजनेबाहेरच्या रुग्णांना विमा संरक्षणासाठी भांडावेच लागते. सीजीचएसबाहेरच्या काहीजणांना प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर आता शस्त्रक्रियेचा खर्च मिळू लागला आहे. पण त्यासाठी त्यांना सीजीएचएसच्या शासन निर्णयाच्या किंवा एखाद्या सीजीएचएस रुग्णाच्या उदाहरणाच्या आधारे या शस्त्रक्रियेसाठी विम्याची कशी गरज आहे हे कंपन्यांना पटवून द्यावे लागते. जेव्हा रुग्णांना अशाप्रकारे भांडून विमा संरक्षण मिळवावे लागते तेव्हा त्यातील निम्म्याच जणांना ते मिळते. इतरांना विमा कंपन्या काही ना काही कारणे देऊन विमा संरक्षण नाकारत राहतात.’’
‘आयसीआयसीआय लाँबार्ड’ या विमा कंपनीच्या ‘हेल्थ अंडररायटिंग अँड क्लेम्स’ विभागाचे उपाध्यक्ष अमित भंडारी म्हणाले, ‘‘लठ्ठपणा एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतला असता काही विमा कंपन्या या शस्त्रक्रियेस विमा संरक्षण देतात. मात्र इतर वेळी लठ्ठपणा कमी करण्यासाठीच्या कोणत्याही उपचारांचा आरोग्य विम्यात समावेश केला जात नाही. रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया खरेच गरजेची आहे का हे सिद्ध करणे अवघड असून त्यात विमा कंपनीस चुकीची माहिती दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’