‘‘जागतिक पातळीवरील दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या म्हणवल्या जाणाऱ्या विद्यापीठांचा आणि शिक्षणसंस्थांचा समावेश नाही, हे खेदकारक आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल,’’ असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री एम. एम. पल्लम राजू यांनी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये रविवारी व्यक्त केले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा दहावा पदवीदान समारंभ उत्साहात साजरा झाला. सिम्बॉयसिस विद्यापीठातर्फे ज्येष्ठ समाजसेविका शोभना रानडे आणि ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलसचिव अजित पालेकर, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे, विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. या वेळी ११ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ४ हजार ५७७ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवी देण्यात आल्या.
या वेळी राजू म्हणाले, ‘‘सर्वांपर्यंत शिक्षण पोहेचवणे आणि त्याच वेळी शिक्षणाचा दर्जाही राखणे आणि शैक्षणिक विषमता दूर करणे अशी आव्हाने भारतीय शिक्षण संस्थेसमोर आहेत. संशोधनाकडेही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच वेळी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सहनशीलतेची, अहिंसेची मूल्ये रुजवण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. जगातील संशोधनामध्ये भारताची टक्केवारी ही २.२ इतकीच आहे. आपल्याकडे राष्ट्रीय सकल उत्पन्नातील फक्त १ टक्के रक्कम संशोधनावर खर्च होते. हे प्रमाण वाढण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी संशोधन हा संस्कृतीचा भाग व्हायला हवा.’’