जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने आज (सोमवारी) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सोहळा इनामदार वाड्यात पहिला मुक्कामासाठी दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्यातून लाखो वारकरी या सोहळ्यासाठी आलेले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम..चा जयघोष अवघ्या देहू नगरीत घुमत आहे.

यावर्षीची वारी ही विशेष असणार आहे. कारण हरितवारी असं वारीचे वैशिष्ट्ये आहे. देवस्थानाच्यावतीने वारीमार्गावर पालखी तळांवर हरितवारी या उपक्रमाधून हजारो वृक्ष लावली जाणार आहेत. मुख्य पुजेच्या वेळी नुकतेच राज्यमंत्री पद मिळालेले संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, पहाटे पाच वाजेच्या सुमारास पालखी सोहळा प्रमुख, अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते श्रींची व शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली. साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर इनामदार वाड्यात श्रीसंत तुकोबांच्या पादुकांची महापुजा करण्यात आली. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातुन ३०० पेक्षा अधिक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. देहू नगरीत भक्तिमय वातावरण असून हरिनामाचा गजर सुरू आहे. सर्वत्र वैष्णवांचा मेळा भरलेला पाहायला मिळत असुन देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस, ग्रामपंचायत यांच्या वतीने योग्य तो बंदोबत ठेवण्यात आला आहे. टाळ मृदंगाने अवघा मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. दरम्यान, महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या नजरा असणार आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम अस जयघोष करीत वारकरी एक एक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकत आहेत.