News Flash

‘सांबार’च्या दरवळात रंगल्या ‘रूपाली’, ‘वैशाली’च्या आठवणी!

‘रूपाली’, ‘वैशाली’ या कट्टय़ांची ओळख बनलेल्या आणि वर्षांनुवर्षे तीच चव असलेल्या ‘सांबार’चा दरवळ.. शरद पवारांपासून अमिताभपर्यंतच्या वलयांकित व्यक्तींनी रंगवलेल्या गप्पांच्या मैफली...

| October 11, 2013 02:50 am

‘रूपाली’, ‘वैशाली’ या कट्टय़ांची ओळख बनलेल्या आणि वर्षांनुवर्षे तीच चव असलेल्या ‘सांबार’चा दरवळ.. शरद पवारांपासून अमिताभपर्यंतच्या वलयांकित व्यक्तींनी रंगवलेल्या गप्पांच्या मैफली..आणि सांबारच्या ‘फॉम्र्युल्या’वर  चोखंदळ नजर कायम ठेवणारे रूपाली, वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या अगत्याच्या आठवणी..!  अशा ‘नॉस्टॅल्जिक’ वातावरणात शेट्टी यांचा ऐंशीवा वाढदिवस पुणेकरांनी गुरुवारी साजरा केला.
केळीच्या पानावरील इडली आणि डोशाने सजलेला केक या अभीष्टचिंतनाचा आकर्षण ठरला. शेट्टी यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. आमदार गिरीश बापट, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, विठ्ठल मणियार, नीलिमा खाडे, बाळासाहेब बोडके, रणजित शिरोळे, बाळासाहेब अमराळे, संदीप खर्डेकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
‘आता दररोज रेस्टॉरंटस्मध्ये हजर नसतो, पण दर आठ दिवसांनी एकदा भेट देतोच,’ असे सांगत शेट्टी यांनी वैशाली आणि रूपालीच्या यशाचे गमक या वेळी उपस्थितांसमोर उलगडले. ते म्हणाले, ‘‘येथील सांबारची चव पहिल्यापासून आतापर्यंत तशीच आहे. हा फॉम्र्युला मी स्वत: तयार करून घेतला होता. मला स्वत:ला मात्र वैशालीतील म्हैसूर मसाला डोसा सर्वाधिक आवडतो. आज प्रसिद्ध असलेल्या अनेक व्यक्तींना मी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून वैशाली किंवा रूपालीत पाहिले आहे. रूपालीत शरद पवार येत असत. अमिताभ आणि जयादेखील रेस्टॉरंटमध्ये आल्याच्या आठवणी आहेत. मात्र, त्यांच्याशी कधी पुढे होऊन बोललो नाही!’’
राजकारण, समाजकारण, नाटय़, चित्रपट, कला, क्रीडा, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील अनेक मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. अनेकांनी जुन्या आठवणी जागवत या आवडत्या कट्टय़ाच्या आठवणी जाग्या केल्या. अनेक शासकीय, तसेच पोलीस अधिकाऱ्यांचीही कार्यक्रमात उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2013 2:50 am

Web Title: jagannath shetty 80th birthday
Next Stories
1 ‘श्रीमंत’ महापालिकेची वाटचाल ‘खडतर’
2 डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत आता महत्त्वाच्या शक्यतांवरच तपास केंद्रित
3 मूलतत्त्वांना धक्का न लावता काळानुरूपता हे किराणा घराण्याचे वैशिष्टय़ – डॉ. प्रभा अत्रे
Just Now!
X