मोशीतील बाजार सुरू; मार्केट यार्डातील मुख्य बाजार बंदच

पुणे : टाळेबंदीत नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला  तसेच जीवनावश्यक वस्तूंची झळ पोहोचू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने उपाययोजना सुरू केली आहे. मार्केट यार्डातील गूळ आणि भुसार बाजाराचे कामकाज बुधवारपासून नियमित झाले असून मोशी येथील भाजीपाल्यांच्या उपबाजाराचे कामकाज रात्रीपासून सुरू झाले. लवकरच मांजरी, उत्तमनगर येथील भाजीपाल्यांचे उपबाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, करोनामुळे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विभाग सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही नियोजन झालेले नाही.

पोलिसांच्या असहकार्यामुळे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर बुधवारपासून (१५ एप्रिल) भुसार बाजार सुरू झाला. त्यानंतर मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजाराचे कामकाज बुधवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शेतीमालाची आवक मोशीतील उपबाजरात होईल. त्यानंतर शेतीमालाच्या गाडय़ांना मोशीतील उपबाजारात प्रवेश दिला जाणार नाही. आवक झालेल्या शेतीमालाची विक्री पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोशीतील उपबाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नाही. आडत्यांनी फक्त घाऊक खरेदीदारांना भाजीपाल्याची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार आवारातील सर्व व्यवहार सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उपबाजारात मास्क बंधनकारक

उपबाजारात येणाऱ्या प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न केल्यास बाजारात प्रवेश दिला जाणार नाही, असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

भाजीपाल्याचा तुटवडा नाही

सध्या शहरात भाजीपाल्याचा पुरवठा पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर, हवेली, मंचर, खेड भागातील शेतकरी करत आहेत. तूर्तास शहरात भाजीपाल्याचा तुटवडा नाही. भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत झाल्यास तुटवडा जाणवणार नाही. भाजीपाल्याचे दर वाढलेले नाहीत. करोनामुळे हॉटेल, खाणावळी बंद आहेत तसेच लग्नसराई नसल्याने भाजीपाल्याच्या मागणीत नेहमीच्या तुलनेत घट झाली आहे, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

भुसार माल मुबलक; ११० गाडय़ांची आवक ; भुसार बाजाराचे कामकाज सुरू

पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजाराचे कामकाज बुधवारपासून नियमित सुरू झाले असून बाजारात भुसार मालाच्या ११० गाडय़ांची आवक बाजारात झाली. पोलिसांनी केलेल्या असहकार्यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला. त्यानंतर भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून नियमित काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी भुसार बाजारात ११० गाडय़ांची आवक झाली. बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. भुसार मालाचे दर स्थिर असून कोणतीही दरवाढ झाली नाही, असे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे भुसार बाजाराचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे. टाळेबंदी उठल्यानंतर भुसारबाजाराचे कामकाज नियमित सुरू होईल, असेही ओस्तवाल यांनी सांगितले.

बाजारात भुसार माल मुबलक असून घाऊक बाजारात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झालेली नाही. किरकोळ विक्रेते तसेच घरगुती ग्राहकांनी जादा मालाची साठवणूक करण्याची गरज नाही.

– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना र्मचट्स चेंबर