गुळाचा नवीन हंगाम सुरू; आवक वाढल्याने दरात घट

राहुल खळदकर, पुणे</strong>

भाज्यांपासून डाळींपर्यंत आणि लाल मिरचीपासून तांदळापर्यंत सर्वाची दरवाढ होत असताना गुळाचे दर मात्र उतरू लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील गुऱ्हाळे सुरू झाली असून गूळ उत्पादकांनी नवीन हंगामातील गूळ बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागलेल्या गुळाचे दर आता उतरत आहेत.

ऐन दिवाळीत गुळाचे दर वाढले होते. श्रावण महिना, गणेशोत्सव आणि दिवाळीत गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मागणीत वाढ झाल्याने दोन महिन्यांपूर्वी गुळाच्या दरात वाढ झाली होती. यंदा पावसाने उघडीप दिली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाळा सुरू होता. पावसाने उघडीप न दिल्याने गूळ तयार करणारी गुऱ्हाळे सुरू होऊ शकली नव्हती. त्यामुळे बाजारात गुळाची आवक कमी होत होती. पश्चिम महाराष्ट्रातील गुऱ्हाळे आता सुरू झाली असून बाजारात गुळाची आवक वाढली असल्याची माहिती पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड भुसार बाजारातील गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या पुणे जिल्ह्य़ातील दौंड तालुका तसेच पश्चिम महाराष्ट्रातून गूळ विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. येथील भुसार बाजारात दररोज ५० ते ६० टन गुळाची आवक सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी गुळाची आवक ३० ते ४० टनांपर्यंत कमी झाली होती. आवक वाढल्याने क्विंटलमागे गुळाच्या दरात ८०० रुपयांनी घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, फलटण तसेच पुणे जिल्ह्य़ातील बारामती आणि दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. परप्रांतातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील गुऱ्हाळेही सुरू झाली आहेत. गुळाची आवक दुपटीने वाढली असल्याचेही बोथरा यांनी सांगितले.

गुळाचा नवीन हंगाम सुरू झाला असून पावसाने उघडीप दिल्याने गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. गुळाचा हंगाम साधारणपणे मार्च महिन्यांपर्यंत सुरू राहतो. त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा गुळाचा तुटवडा निर्माण होतो. सध्या सणासुदीचे दिवस नाहीत, त्यामुळे गुळाला फारशी मागणी नाही. मागणीच्या तुलनेत गुळाची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो गुळाचे दर ४५ ते ५० रुपये असे आहेत.

– जवाहरलाल बोथरा, गूळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, भुसार बाजार, पुणे