पुण्याच्या महापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 25mukariप्रशांत जगताप बहुमताने निवडून आले, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे निवडून आले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी करून लढली, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी स्वतंत्ररीत्या ही निवडणूक लढवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीत तटस्थ राहिली.
महापालिका सभागृहात गुरुवारी सकाळी अकरा वाजता महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत मनसेचे वसंत मोरे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांना राष्ट्रवादी व काँग्रेसची मिळून ८४ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपच्या अशोक येनपुरे यांना २५ आणि शिवसेचेने सचिन भगत यांना १२ मते मिळाली. या निवडणुकीनंतर उपमहापौरपदासाठी मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. या पदासाठी मनसेच्या अस्मिता शिंदे यांनी अर्ज भरला होता. त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर मतदान घेण्यात आले. त्यात काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांना ८४, भाजपच्या वर्षां तापकीर यांना २५ आणि शिवसेनेचे योगेश मोकाटे यांना १२ मते मिळाली.
सोयीस्कर आघाडय़ा- वागसकर
पाणीपट्टी वाढवताना राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष एकत्र आले आणि आता महापौर, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. एकुणात पुणेकरांसाठी काहीही करण्याची या चारही पक्षांची इच्छा नाही. त्यांच्या सोयीस्कर आघाडय़ा सुरू आहेत. त्यामुळेच आम्ही महापौर, उपमहापौर निवडणुकीवर बहिष्कार घातला, असे मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनी सांगितले.
या निवडीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष करत जगताप आणि अलगुडे यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांना उचलून व्यासपीठावर नेले. सभागृहात त्या वेळी दोन्ही पक्षांचा आनंदोत्सव सुरू होता.
पदार्पणातच महापौरपदाची संधी
महापौरपदी नव्याने निवडून आलेले प्रशांत जगताप हे गेली चौदा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असून पक्षाच्या अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी आतापर्यंत सांभाळल्या आहेत. शहर राष्ट्रवादीचे चिटणीस, सरचिटणीस, पीएमटीचे सदस्य, पीएमपीचे संचालक आदी जबाबदाऱ्या व पदे त्यांनी भूषविली आहेत. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा पालिकेवर निवडून आले. त्यांची आई रत्नप्रभा जगताप सन २००७ मध्ये निवडणुकीत महापालिकेवर निवडून आल्या होत्या.
अलगुडे यांनाही मोठी संधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकारी अलगुडे यांना पक्षाने संधी दिल्यामुळे त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनीही एकच जल्लोष केला. अलगुडे गोखलेनगर-वडारवाडी या भागातून तीन वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत. गेली अनेक वर्षे ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. महापालिकेत त्यांनी स्थायी समितीसह अन्यही समित्यांवर काम केले आहे.

प्रलंबित प्रश्न सोडवणार
महापौरपदी काम करत असताना शहराला पुढे नेण्यासाठीच काम करीन, तसेच शहराचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यावर भर राहील, असे महापौर प्रशांत जगताप यांनी निवडीनंतर सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महापौरपदाची संधी वानवडीतील आमच्या जगताप कुटुंबाला दिली आहे. या संधीचा उपयोग आणि पदाचा वापर मी सर्वसामान्यांसाठीच करीन. माझी वाटचाल कधीही चुकीच्या दिशेने होणार नाही. मी सर्व प्रकारच्या कष्टातून पुढे आलो आहे. दूध केंद्र चालवले आहे, गुऱ्हाळ चालवले आहे. इतरही छोटे-मोठे व्यवसाय केले आहेत. ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या त्या योग्यप्रकारे पार पाडल्या. यापुढेही शहराचे प्रश्न सोडवण्यावर; मुख्यत: सार्वजनिक वाहतूक सुधारणेवर माझा भर राहील.
महापौर प्रशांत जगताप