कर्जत ते पुणे रेल्वे प्रवासादरम्यान बॅग आणि मोबाईल चोरणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे सात मोबाईल आणि चार तोळे सोने जप्त केले आहे. चोरीच्या तीन मोबाईलचे मालक मिळाले आहेत.
विशाल भारत आवाड उर्फ विजय बाबुभाई मकवाना (वय २५, रा. कांदीवली, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर रेल्वे पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेश निंबाळकर आणि सुदेश सपकाळ हे गस्त घालत असताना त्यांना एसएनडीटी कॉलेजसमोर एक व्यक्ती मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी दोघे गेले असता मोबाईल विक्री करणारा हा काही दिवसांपूर्वी डेक्कन पोलिसांनी गरवारे महाविद्यालयात मुलींची छेडछाड करताना पकडलेला आरोपीच दिसून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. त्याचा पाठलाग करून पकडल्यानंतर त्याच्याकडे चोरीचे सात मोबाईल मिळून आले. त्याला पोलीस ठाण्याला घेऊन पोलीस उपनिरीक्षक भूषण दायमा यांनी चौकशी केली असता त्याने हे मोबाईल कर्जत ते पुणे रेल्वे स्थानक दरम्यान चोरल्याचे सांगितले आहे. त्याच्याकडे अधिक तपास केला असता रेल्वेतून बॅग चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, चार तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. हे गुन्हे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.