सत्य आणि अहिंसा या मूल्यांवर निष्ठा ठेवणारे.. ‘पर्यूषण पर्व’ उपासनेच्या माध्यमातून चित्तशुद्धी करणारे.. कष्ट करण्याची तयारी या गुणवैशिष्टय़ामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारे.. जैन धर्माची अशी विविध प्रकारची सर्वागीण माहिती एकाच छताखाली पाहायला मिळत आहे, ती ‘जैन पॅव्हेलियन’मध्ये.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’तर्फे (जितो) मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकामध्ये गुढी पाडव्याचे औचित्य साधून ‘जितो कनेक्ट २०१६’ ही जागतिक परिषद शुक्रवारपासून भरविण्यात आली आहे. जैन मूल्ये, संस्कृती, परंपरा, समृद्ध वारसा, शिल्प, विज्ञान अशा विविधांगी माध्यमातून जैन धर्माचे दर्शन घडविणारे ‘जैन पॅव्हेलियन’ हे जितो कनेक्टचे आकर्षण केंद्र ठरले आहे.
जैन डाक तिकीट प्रदर्शनातून भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील कालखंडाबरोबरच जैन धर्मातील महत्त्वाच्या घटनांना उजाळा मिळतो. जैन धर्माचे २४ र्तीथकरांची वेगवेगळया दगडांमध्ये घडविलेली शिल्पे, नाशिक जिल्ह्य़ातील मांगी तुंगी येथील सर्वात उंच जैन मूर्तीची प्रतिकृती यांचे एक स्वतंत्र दालन आहे. जैन हस्तलेखणी असलेल्या ब्राह्मी लिपीचा इतिहास, नवकार मंत्र, जैन दर्शनावर आधारित शास्त्रांची रचना, विविध संप्रदायांच्या संत-महंताचे साहित्य पाहावयास मिळते. ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, गणित अशा विविध विषयांवरील पुस्तकांचे दालन या पॅव्हेलियनमध्ये आहे. जैन आणि आधुनिक जीवन या विषयावरील लेसर शो हे एक वेगळेपण अनुभवता येते. जैन पॅव्हेलियनला रविवापर्यंत (१० एप्रिल) भेट देऊन जैन धर्माची माहिती घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain religion exhaustive information under one roof
First published on: 09-04-2016 at 03:17 IST