आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून समुद्रामध्ये हल्ले घडवण्याची तयारी सुरू आहे, यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. अशी माहिती नौदल प्रमुख करमबीर सिंह यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर, दहशतवाद्यांचे कोणत्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

लष्कराचे दक्षिणी मुख्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यान – २०१९ अंतर्गत ‘इंडो पॅसिफिक – चेंजिग डायनॅमिक्स – मेरिटाइम सिक्युरिटी इम्पेरेटिव्हस फॉर इंडिया’ या विषयावर नौदलप्रमुख करमबीर सिंह यांनी व्याख्यान दिले. यावेळी लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना देशातील संरक्षण विभागाबाबत त्यांनी माहिती दिली.

नौदल प्रमुख करमबीर सिंह म्हणाले की, मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय नौदलास संरक्षण अर्थ संकल्पाच्या केवळ १८ टक्के निधी उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकदा नौदलास संरक्षण प्रणाली आणि दारूगोळा खरेदी करताना मर्यादा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, भविष्यामध्ये नौदलासमोर पायरसी, अंमली पदार्थ आणि मानवी तस्करी, हवामान बदल, आदी आव्हान असणार आहेत. त्याच प्रमाणेच सुरक्षेच्या दृष्टीने चीनच्या हिंद महासागरातील हालचालीवरही भारतीय नौदलाचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.