‘आपला विकास हा पूर्णपणे पाण्यावर केंद्रिभूत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाण्याची समस्या ही पाण्याचे योग्य प्रकारे करण्यात आलेल्या नियोजनानेच दूर होऊ शकेल,’ असे मत माजी ऊर्जामंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या जलमित्र पुरस्कार समारंभामध्ये प्रभू बोलत होते. या वर्षीचा जलमित्र पुरस्कार उस्मानाबाद येथील नॅचरल शुगर अँड अलाइज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, माढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, जल मित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
या वेळी प्रभू म्हणाले, ‘औद्योगिक विकास, कृषी क्षेत्राचा विकास, नागरीकरण अशा विकासाशी निगडित सर्व गोष्टी पाणी या घटकावर केंद्रिभूत झाल्या आहेत. आपल्याकडे पाण्याचे स्रोत आहेत मात्र, त्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. ज्या भागात पाण्याची पुरेशी उपलब्धता नाही, तेथील समस्याही पाण्याचे नियोजन करून सोडवणे शक्य आहे. विकास साधायचा असेल, तर पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’