पवना नदीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य असून दूरदूपर्यंत जलपर्णी पसरली आहे. मोरया गोसावी उत्सव सुरू होत असून त्याचा हजारो भाविकांना त्रास होणार असल्याचे सांगत ही जलपर्णी तातडीने न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिला आहे.
चिंचवडगावात धनेश्वर पूल ते थेरगाव पुलादरम्यान नदीपात्रात पूर्णपणे जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. मोरया गोसावींचा उत्सव सोमवारपासून सुरू झाला आहे. उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, त्या जलपर्णी तशाच असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकारी कोणतीच कार्यवाही करत नाही. परिसरात डासांचा उपद्रव झाल्याने नागरिक हैराण आहेत. यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक बाबा धुमाळ, अश्विनी चिंचवडे, संगीता पवार, संगीता भोंडवे, नीलेश बारणे, संपत पवार, विमल जगताप, धनंजय आल्हाट यांनी याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले.