काँग्रेसप्रणीत सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, राबवलेल्या योजना तसेच विविध उपक्रमांचे श्रेय काँग्रेस पक्षाला मिळत नाही, त्याचा निवडणुकीत अपेक्षित लाभ होत नाही म्हणून याबाबतची जागृती करण्यासाठी काँग्रेसने जनजागरण रथयात्रा सुरू केली असून २१ सप्टेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन होणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काळेवाडीतील सभेत ही माहिती दिली. केंद्र व राज्य शासनाच्या योजना व निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने िपपरी-चिंचवडमध्ये सुरू केलेल्या रथयात्रेचा आरंभ माणिकरावांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार शरद रणपिसे, प्रदेश सचीव सचिन साठे, महिलाध्यक्षा ज्योती भारती, विरोधी पक्षनेते कैलास कदम, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, काँग्रेसने अनेक चांगल्या व लोकहिताच्या योजना राबवल्या. मात्र, विरोधक त्या जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत, त्यात आडकाठी निर्माण करतात. यादृष्टीने जनजागृती करणारा उपक्रम राज्यात सर्वप्रथम भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केला. यापुढे राज्यातील सर्व जिल्ह्य़ात रथयात्रांचे आयोजन करण्यात येणार असून २१ सप्टेंबरला वाशिम येथे, तर २८ सप्टेंबरला जालना जिल्ह्य़ात यात्रांचा आरंभ होणार असून त्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. िपपरीतील यात्रेच्या समारोपासही मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. महिनाभरात गावागावांमध्ये हा रथ जाईल व काँग्रेस कार्यकर्ते जनजागृती करतील, असे ते म्हणाले.