सहकार क्षेत्रात नावाजलेल्या पुणे जनता सहकारी बँकेला मार्च २०१५ अखेर ६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, बँकेचा एकूण व्यवसाय ११,८२१ कोटींपेक्षा अधिक झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून १८ नवीन शाखांसाठी जनता बँकेला परवानगी दिली असून, लवकरच या शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, उपाध्यक्ष संजय लेले व मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. आर्थिक वर्षे २०१४-१५ मध्ये बँकेने भाग भांडवलामध्ये ३१ टक्क्य़ांची वाढ करीत १६१ कोटी भाग भांडवल संकलित केले. ठेवी व कर्जामध्येही १५ टक्क्य़ांनी वाढ झाली. मार्च २०१५ अखेर बँकेकडे ७०७० कोटी रुपयांच्या ठेवी, तर ४७५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले. निव्वळ नफ्यामध्येही मागील वर्षांच्या तुलनेत १०.४१ टक्क्य़ांनी वाढ झाली. अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण बँकेने ०.९५ टक्क्य़ांपर्यंत कमी केले आहे.
बँकेच्या सध्या ४६ शाखा आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या १८ शाखांपैकी पुण्यात कात्रज- कोंढवा, पाषाण-सूस रस्ता, हडपसर, वारजे-माळवाडी, पिरंगुट, मोशी येथे शाखा उघडण्यात येणार आहेत. मुंबईत मुलुंड, कांदिवली, गोरेगाव, घोडबंद रोड ठाणे, तसेच पेण, उदगिर, जालना, अहमदनगर, नाशिक, गांधीनगर (कोल्हापूर), लांजा (रत्नागिरी) व सोलापूर येथेही शाखा उघडण्यात येणार आहे.