जंगली महाराज रस्त्याची दुरवस्था; पदपथांवर अतिक्रमण

वाहतुकीची सातत्याने होत असलेली कोंडी, पदपथांवर झालेले अतिक्रमण आणि पदपथांची दुरवस्था, अस्ताव्यस्त पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा नियम मोडून लावण्यात येत असलेल्या दुचाकी, पदपथांवरून जाणारी वाहने आणि पदपथांवर टाकण्यात येत असलेला कचरा असे ‘पुरस्कारप्राप्त’ ठरलेल्या जंगली महाराज रस्त्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रशस्त रस्ता,सुशोभीकरण, वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी सुविधा दिल्याचा दावा करून पुरस्कार मिळालेल्या या रस्त्याची वस्तुस्थिती प्रत्यक्षात वेगळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कागदोपत्री केलेल्या सादरीकरणापुरताच हा रस्ता आदर्श रस्ता ठरला आहे.

शहरातील रस्त्यांपैकी प्रमुख असलेल्या जंगली महाराज रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम महापालिकेच्या पथ विभागाकडून गेल्या वर्षी मार्च महिन्यात हाती घेण्यात आले.  महापालिकेच्या पादचारी सुरक्षा धोरणानुसार प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सुरक्षित आणि विना अडथळा पदपथ, विशेष व्यक्तींसाठी खास सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा काही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करून त्याचा आराखडाही करण्यात आला. त्यासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजनही करण्यात आले. टप्प्याटप्प्याने हे काम सुरु झाले आणि हा रस्ता कसा आदर्श आहे, याचे कौतुक सुरु झाले. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याची परिस्थिती वर्षभरानंतर निराळी असल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाची निष्क्रियता आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा त्याला कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

पाश्चात्त्य देशातील रस्त्यांच्या धर्तीवर या रस्त्याची पुनर्रचना केल्याचे सांगत महापालिकेने हौसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन (हुडको) या शासकीय संस्थेकडे पुरस्कारासाठी अर्ज केला. हुडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. रवी कांत यांनी महापालिकेला पत्र पाठवून रस्त्याच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे जंगली महाराज रस्त्याच्या धर्तीवरच शहरातील अन्य शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या पुनर्रचनेलाही गती मिळाली. मात्र, कागदोपत्री केलेले सादरीकरण, आकर्षक संकल्पचित्रापुरताच हा रस्ता आता मर्यादित राहिला आहे. संकल्पचित्र आणि सादरीकरणातूनच महापालिकेला हा पुरस्कार मिळाला असल्याचे पुढे येत आहे.

पुनर्रचनेमुळे वाहतूक सुरळीत होईल, पादचाऱ्यांना विनाअडथळा पदपथांवरून जाता येईल असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात पुनर्रचनेमुळे रस्ता अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: गर्दीच्या वेळात वाहनचालकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या एका बाजूला सुशोभीकरण करण्यात आले. सुभोभीकरण करताना एका बाजूला हिरवळ ठेवण्यात आली. या हिरवळीला पाणी देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली. पण आता ही व्यवस्थाच कोलमडली आहे. त्यामुळे टँकरने पाणी घालण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पदपथांवर दुचाकी येऊ नयेत यासाठी विशिष्ट खांबांची उभारणी करण्यात आली, पण त्यातूनही वाहने पदपथांवर येतच आहेत. पदपथांवर तर सर्रास दुचाकी लावण्याचे प्रकार घडत आहेत. याशिवाय लहान-मोठय़ा फेरीवाल्यांनीही पदपथांवर अतिक्रमण केले आहे. महापालिकेचे जुने दिशादर्शक फलकही याच रस्त्यावर तसेच ठेवण्यात आले असून रस्त्यावरील झाडे कोमेजून गेली आहेत. ही वस्तुस्थिती असतानाही हा रस्ता मात्र ‘आदर्श’ ठरला असून त्याला पुरस्कारही मिळाला आहे. केवळ आकर्षक सादरीकरणामुळेच पुरस्कार मिळाल्यावरही त्यामुळे शिक्कामोर्तब होत आहे.

आणखी दहा रस्त्यांची पुनर्रचना

जंगली महाराज रस्त्याची ही वस्तुस्थिती असताना शहरातील प्रमुख दहा रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यापैकी फग्र्युसन रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली असून त्यासाठी अंदाजपत्राकतही तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांची पुनर्रचना करताना मात्र त्या रस्त्याची नक्की आवश्यकता काय आहे, याचा कोणताही विचार होताना दिसत नाही. केवळ पाश्चात्त्य धर्तीवर रस्त्यांची पुनर्ररचना करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा फटका पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.