पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी आंदोलन केले.

शुक्रवारी सकाळी बारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे मुख्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच अडकली. त्याचा फटका महापौर राहुल जाधव यांनाही बसला. महापौर गाडी सोडून चालत मुख्यालयात दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाल्या,की शहरात बांधकाम व्यावसायिक बेकायदा बांधकामे करत आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

आयुक्त तसेच पक्षनेत्यांचे पालिकेच्या कारभारावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. काही ठिकाणी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांचे संगनमत आहे. पूर्णत्वाचा दाखला घेतलाच जात नाही. थेरगावात १२ मीटर रस्त्याचे काम नियमबाह्य़ पद्धतीने केले जात आहे. सामान्यांना नियम सांगितले जातात. धनदांडग्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.