जपानी संशोधक डॉ. मिचिहिरो ओगावा आणि डॉ. रेईका ईदा यांचा अभ्यास

शिवकाळ, नंतरची पेशवाई आणि ब्रिटिश अमलाखालील एकोणिसाव्या शतकातील काळात समाजातील जातीव्यवस्थेच्या रचनेत आमूलाग्र बदल घडत गेले. वसाहतींचे राज्य सुरू झाल्यावर तर जातिव्यवस्थेने बाळगलेली लवचिकता पूर्ण गमावली. समाजघटकांतील वाढते अंतर जातीव्यवस्थेच्या भिंती उंच करत गेले, असे मत जपानी संशोधक डॉ. मिचिहिरो ओगावा आणि डॉ. रेईका ईदा यांनी व्यक्त केले.

सेंटर फॉर एशियन स्टडीज आणि जपान सोसायटी फॉर  प्रमोशन ऑफ सायन्स यांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या ‘कन्स्ट्रक्शन ऑफ कास्ट  इन मॉडर्न महाराष्ट्र’ या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी डॉ. ओगावा आणि डॉ. ईदा  काम करत आहेत. या प्रकल्पावर मात्सुओ  मिझुओ आणि क्योसुके अदाची हे जपानी अभ्यासकही कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रकांत अभंग, देवकुमार अहिरे आणि अमृत साळुंके यांचाही या प्रकल्पात सहभाग आहे. दोन वर्षांच्या कालावधीत या अभ्यासकांनी आधुनिक महाराष्ट्रातील जातीव्यवस्थेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ. मिचिहिरो ओगावा यांनी संशोधनासाठी मराठेशाहीतील इंदापूर परगणा आणि मराठेकालीन महसूलव्यवस्था हा विषय निवडला होता. त्या काळातील सर्व पुरावे, पत्रव्यवहार मराठी आणि मोडी लिपीत असल्याने त्यांनी मराठी आणि मोडी लिपीचा अभ्यास केला. त्यासाठी डेक्कन कॉलेजमधील तज्ज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. रेईका ईदा यांनी महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी कलावंतांच्या परंपरांच्या संदर्भात  जातीव्यवस्थेचा विचार केला आहे.

डॉ. मिचिहिरो म्हणाले, मराठेशाहीत परगण्यांतून प्रामुख्याने शेती उत्पन्नावरील कर आणि बारा बलुतेदारांची व्यवस्था तसेच जकात, मक्ते व दंड हे उत्पन्नाचे मार्ग होते. मुघल आमदानीत शेतीवर तब्बल ६० टक्के कर होता. हे प्रमाण शिवाजी महाराजांनी कमी करून ३३ टक्के ठरवले आणि पुढे पेशवाईमध्येही तेच कायम होते. याशिवाय जकातीचे उत्पन्न आणि बारा बलुतेदारांनी उत्पादन केलेल्या वस्तूंवर कर लावला जात असे. बलुतेदारी व्यवस्था ही परगण्यांना स्वयंपूर्ण ठेवणारी होती, असे आढळून आले. प्रत्येक समाजघटक स्वत:कडची कामाची जबाबदारी निभावत असे. मात्र ही व्यवस्था लवचिक होती. कालांतराने ही लवचिकता कमी झाली आणि व्यवस्था कुलूपबंद झाली.

डॉ. रेईका ईदा म्हणाल्या, तमाशाला उत्तर पेशवाईत नागरी समाजात स्थान होते. पेशवाई अस्तंगत झाल्यावर या कलेचा नागरी आश्रय खुंटल्याने तमाशा कलावंत नाईलाजाने ग्रामीण भागात स्थलांतरित झाले. पोटासाठी भ्रमंती करताना साहजिकच ग्रामीण प्रेक्षकांना समजेल, आवडेल असे बदल तमाशा कलावंतांनी स्वीकारले. त्यामुळे नागरी अभिरुचीने हा लोकप्रिय कलाप्रकार रुचला नाही. तमाशा या कलेला स्वत:चे असे घराणे, शैली, परंपरा फारशी उरली नाही. जुन्या तमाशा कलावंतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तमाशा आणि लावणी कला प्रामुख्याने मौखिक स्वरुपात राहिल्याने या कलेच्या विस्ताराला मर्यादा आल्या.