पुण्यात जात पंचायतीकडून एका व्यक्तीला समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पद्मशाली कमिटीचे विद्यमान सरपंच सोमनाथ कैची, विश्वस्त महादेव काड्गी अध्यक्ष दिलीप जाना, उपाध्यक्ष विनायक साका आणि सदस्य विनोद जालगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले पेठेतील पद्मशाली समाजाच्या जात पंचायतीनं एका व्यक्तीला समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विश्वस्त संस्थेच्या दुकानाची भाडे पावती नावावर करून देण्यासाठी पैसे न दिल्याने तक्रारदार सचिन दासा आणि जात पंचायतीचे विद्यमान सरपंच सोमनाथ कैची यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर सोमनाथ कैची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले होते. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ कैची यांना समज देखील दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरेंद्र दासा वय यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून कमिटीचे विद्यमान सरपंच सोमनाथ कैची, विश्वस्त महादेव काड्गी अध्यक्ष दिलीप जाना, उपाध्यक्ष विनायक साका आणि सदस्य विनोद जालगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दासा हे पद्मशाली पंच कमिटी विश्वस्त संस्थेच्या मालकीचे दुकान चालवत होते. या दुकानाच्या भाड्याची पावती फिर्यादीच्या आजोबांच्या नावावर आहे. ही भाडे पावती आपल्या नावावर करण्यासाठी सचिन यांनी संस्थेकडे वेळोवेळी विनंती अर्ज केले होते. मात्र सरपंच, विश्वस्त आणि अध्यक्ष यांनी भाडे पावती नावावर करण्यासाठी तब्बल ५ लाख रूपये आणि भाड्यापोटी दरमहा १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याला सचिन यांनी नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी सचिन यांच्या भावाने ही भाडे पावती नावावर करून घेण्यासाठी सरपंचांना फोन केला होता. मात्र, सरपंच सोमनाथ कैची यांनी त्यांना शिवीगाळ केली. धंदा कसा करतो तेच बघतो, अशी धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे सचिन दासा पोलिसांकडे गेले. तेव्हा पोलिसांनी सरपंचाना बोलवून समज दिली होती.