20 September 2020

News Flash

पुलंना हसवू शकलो याचा मला आनंद

‘बटाटय़ाची चाळ’च्या धर्तीवर मी ‘उडती तबकडी’ ही कथा लिहिली होती. पुलंच्या घरी आम्ही जमलो होतो.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील पुलोत्सवात जयंत नारळीकर यांनी स्नेहबंधाच्या स्मृती जागविल्या

‘बटाटय़ाची चाळ’च्या धर्तीवर मी ‘उडती तबकडी’ ही कथा लिहिली होती. पुलंच्या घरी आम्ही जमलो होतो. सुनीताबाई यांनी त्या कथेचे वाचन केले. कथेतील काही स्थळं अशी होती की तिथे पुलंना हसायला आलं. ज्या व्यक्तीने बृहन् महाराष्ट्राला हसवले त्याला हसवू शकलो याचा आनंद त्या वेळी मला झाला होता.. जणू नुकताच घडला अशा शैलीत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी हा किस्सा सांगत गुरुवारी पुलंच्या स्मृती जागविल्या. विनोद आणि बटाटेवडा ही आमच्या दोघांची आवडीची गोष्ट, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ यांच्यातर्फे आयोजित ‘पुलोत्सव’मध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते नारळीकर यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, गजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

पुलंनी एकदा ओलांडलेल्या आणि एकदा न ओलांडलेल्या ‘लक्ष्मणरेषा’ची गंमत सांगताना नारळीकर म्हणाले, केंब्रिजहून भारतात आलो त्या वेळी माझे लग्न ठरले होते. माझ्याबद्दल पुष्कळसे लिहून आल्यामुळे मंगला आणि मी, आम्ही सार्वजनिक ठिकाणी जात नसू. मंगलाच्या काकांनी ‘वाऱ्यावरची वरात‘ची दोन तिकिटे दिली होती. या नाटकाला आम्ही येणार असल्याचे  माझ्या मामांनी पुलंना सांगितले होते. नाटकाचा पहिला अंक संपल्यावर पुलंनी आम्हाला भेटायला बोलावले होते. नाटक सुरू झाले तेव्हा पुलंनी ‘जयंत नारळीकर आले आहेत. मात्र, तुम्ही नाटक बघणार नाही म्हणून ते कुठे बसले आहेत हे सांगणार नाही,’ असे जाहीर केले. मग नाटक संपण्याआधी दहा मिनिटे आम्ही टॅक्सीने घरी आलो होतो.

एकदा दूरध्वनी आला. पुलं आणि सुनीताबाई यांनी माझे अभिनंदन केले. मला फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. ही गोष्ट पुलंना आधीच माहीत असली, तरी मला न सांगण्याची लक्ष्मणरेषा त्यांनी पाळली होती, अशीही आठवण त्यांनी सांगितली.

पुलं आणि सुनीताबाई यांनी दिलेल्या देणगीतून आयुकाच्या आवारात उभारलेल्या इमारतीला ‘पुलत्स्य’ हे सप्तर्षीसमूहातील एका ताऱ्याचे नाव दिले, असेही नारळीकर यांनी सांगितले.

शास्त्राचा ललित लेखनाशी संबंध नसतो ही माझी समजूत नारळीकर यांच्या लेखनामुळे दूर झाली, असे मिरासदार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 3:13 am

Web Title: jayant naralikar remembered the memories of p l deshpande
Next Stories
1 बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे प्रमाण नगण्य!
2 जाहिरात फलकांबाबतचा पालिकेचा दावा खोटा
3 ‘एसआरए’चा प्रतिसाद नसल्याने झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन रखडले
Just Now!
X