महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित हल्लोखोर सापडले या गोष्टीचे समाधान आहे. त्याबद्दल तपास यंत्रणांचे अभिनंदन करतो. मात्र या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करून हल्ल्याचा सूत्रधार कोण याचा शोध घेतला जावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्त केली.

डॉ. दाभोलकर यांचा स्मृतिदिन या वर्षीपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘वैज्ञानिक दृष्टिकोन कशासाठी?’ या कार्यक्रमामध्ये नारळीकर बोलत होते. डॉ. शां. ब. मुजुमदार, मुक्ता दाभोलकर, डॉ. सत्यजित रथ आणि डॉ. विवेक माँटेरो उपस्थित होते.

नारळीकर म्हणाले,  अनेकजण अजून १८ व्या शतकातूनही बाहेर पडलेले नाहीत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत आपण बरेच मागे आहोत. वस्तू अथवा ज्ञान प्रत्येकाने तपासून घेऊन चांगले की वाईट हे ठरवावे, मात्र तसे करण्याची इच्छाशक्ती नसल्याने अनेक जण अंधश्रद्धांमागे वाहवत जात आहेत.

रथ म्हणाले, वैज्ञानिक दृष्टिकोन हे मानवाच्या अस्तित्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दैनंदिन जीवनातला प्रत्येक निर्णय आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरूनच घेतो, मात्र शोषण व्यवस्थेच्या प्रतिनिधींनी आपली बाजू बळकट करण्यासाठी अंधश्रद्धांचा वापर केला.  माँटेरो म्हणाले, जेवढा पुरावा तेवढा विश्वास या शब्दांत डॉ. दाभोलकर यांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्याचे सांगितले.