पुणे : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय संस्थांतील प्रवेशांसाठीची मेमध्ये होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची आल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटद्वारे केली.

राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) दरवर्षी जेईई मेन्स ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी मिळण्यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यांत घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमधील परीक्षा झाली. तर २७, २८ आणि ३० एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता २४ ते २८ मे दरम्यान होणारी होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षेच्या पुनर्नियोजनाची माहिती स्वतंत्रपणे देण्यात येईल. तसेच परीक्षेच्या नोंदणीची माहितीही दिली जाईल. विद्यार्थ्यांना घरी राहून परीक्षेचा सराव एनटीए अभ्यास अ‍ॅपद्वारे करता येईल, असे एनटीएने स्पष्ट के ले आहे.