अभियांत्रिकी प्रवेशांसाठी झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) परीक्षेत मुंबईच्या स्वयम छुबेने १०० र्पसेटाइलसह राज्यात पहिला क्रमांक मिळवला. मुलींमध्ये इंद्रायणी तायडे (९९.९७ पर्सेटाईल) हिने बाजी मारली. देशभरातील २४ विद्यार्थ्यांना १०० र्पसेटाइल मिळाले.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) शुक्रवारी रात्री उशिरा जेईईचा निकाल जाहीर केला. एनटीएतर्फे वर्षांतून दोन वेळा जेईई मुख्य परीक्षा घेतली जाते. जानेवारीत झालेल्या परीक्षेनंतर एप्रिलमध्ये होणारी परीक्षा करोना संसर्गामुळे सातत्याने पुढे ढकलावी लागली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १ ते ६ सप्टेंबरदरम्यान देशभरात परीक्षा घेण्यात आली.

जानेवारीत या परीक्षेसाठी देशभरातील ९ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सप्टेंबरमधील परीक्षेसाठी ८ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जानेवारी आणि सप्टेंबर मिळून ११ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १० लाख २३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यांमध्ये ७ लाख १५ हजार मुले, ३ लाख ८ हजार मुली आणि पाच तृतीयपंथीय असल्याची माहिती एनटीएने दिली. देशभरातील ४ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि सप्टेंबर अशा दोन्ही परीक्षा दिल्या. दोन्ही परीक्षांपैकी ज्या परीक्षेत सर्वात चांगली कामगिरी असेल, ते गुण ग्राह्य़ धरले जातात.

या परीक्षेतील अडीच लाख विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी (अ‍ॅडव्हान्स) पात्र ठरले असून खुल्या गटाची पात्रता श्रेणी ९०.६५३ आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

तेलंगणाची बाजी

जेईई मेन्सच्या सप्टेंबरमधील परीक्षेत शंभर र्पसेटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेलंगणाचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. त्यानंतर दिल्लीचे पाच, राजस्थानचे चार, आंध्र प्रदेशचे तीन, हरियाणाचे दोन आणि गुजरात, महाराष्ट्रातील प्रत्येकी एक विद्यार्थी आहेत.

स्वयमची अभ्यासपद्धती..

स्वयम छुबे याला २९७ गुण मिळाले आहेत. मूळचा मुंबईचा असलेल्या स्वयमचे पालक डॉक्टर आहेत. लहानपणापासून गणित विषय खूप आवडतो. परीक्षेच्या तयारीसाठी खासगी शिकवणी होती मात्र, त्याचबरोबर घरीही अभ्यास केला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पुस्तकांवरूनच सगळा अभ्यास केला, असे स्वयम याने सांगितले.