अनधिकृत प्रवासी वाहतुकीच्या आरोपावरून भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका जीपचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ६१ वर्षीय या जीपचालकाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप नातलगांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन देण्यात आले.
बाजीराव पाटोळे, असे मृत्यू झालेल्या जीपचालकाचे नाव आहे. पाटोळे हे सकाळी भोसरीतील पांजरपोळ येथे जीप घेऊन उभे असताना अनधिकृत वाहतुकीच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व भोसरी पोलीस ठाण्यात नेले. चौकशी सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले.
घटना समजल्यानंतर पाटोळे यांचे नातेवाईक रुग्णालयात जमा झाले. पाटोळे यांचा मुलगा श्याम पाटोळे हे वकील असल्याने वकील मंडळीही मोठय़ा संख्येने जमा झाली. पाटोळे यांचा मृत्यू पोलिसांनी मानसिक त्रास दिल्यानेच झाला असल्याचा आरोप करीत नातलगांनी मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला.