बालगंधर्व परिवारतर्फे ज्येष्ठ तमाशा कलावंत हिराबाई लाखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटकांसाठी कीर्ती शिलेदार, बालनाटय़ासाठी प्रकाश पारखी आणि निवेदक बच्चू पांडे यांना गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त २५ आणि २६ जून असे दोन दिवस रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांच्या या महोत्सवात लावणी, एकपात्री, शाहिरी, लोककला, नाटय़संगीत, जादूचे प्रयोग असे विविध कार्यक्रम रंगणार असून, रसिकांना विनाशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापनदिन साजरा करताना सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वाना एकत्र आणण्याचा उद्देश आहे. या महोत्सवामध्ये एक हजार कलाकार कोणताही मोबदला न घेता आपला कलाविष्कार सादर करणार आहेत, अशी माहिती बालगंधर्व परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
नाटय़समीक्षक राज काझी, अभिनेते स्वरूपकुमार, अभिनेत्री भारती गोसावी, एकपात्री कलाकार मंजिरी धामणकर, वंदन नगरकर, सतीश पंडित, रश्मी एकबोटे, नीलकंठ कुलकर्णी, शाहीर बाबासाहेब काळजे, जादूगार विनायक कडवळे, बंडा देशमुख, भास्कर महाडिक, सखाराम भिलारे, रोहन पेंडर, मंदार बापट, विजय गायकवाड, िपकी पुराणिक, रेश्मा पुणेकर, राधिका पाटील, सुरेश बांदल, सुनील करपे, दत्तोबा भाडळे, जािलदर दुलगुडे, व्यवस्थापक प्रवीण बर्वे, सोमनाथ फाटके, व्यंकटेश गरुड, प्रतिमा काळेले, अनिल गोंदकर, कलाल पेंटर, माधव थत्ते यांनाही गौरविण्यात येणार आहे.
 
बालगंधर्व आयडॉल
शहर परिसरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून ‘बालगंधर्व आयडॉल’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक येथे २२ आणि २३ जून रोजी ही स्पर्धा होणार असून, नावनोंदणीसाठी ९८२२२८१०७३ किंवा ९९२१८२५५५६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना ११ हजार, ९ हजार आणि ७ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.