बायोस्फिअर्स, इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे म.न.पा. आणि पुणे वनविभाग यांच्या वतीने पर्यावरणावर आधारित ‘जीविधता महोत्सव २०१४-१५’  गेल्या शनिवारी-रविवारी साजरा करण्यात आला.
या महोत्सवासाठी एंप्रेस बोटनिकल गार्डन व संजावनी ग्रुप यांचे सहकार्य लाभले. महोत्सवाचे उद्घाटन खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे व वनस्पती अभ्यासक श्रीधर महाजन यांच्या हस्ते ३० जानेवारी रोजी झाले. या कार्यक्रमात डॉ. श्रीनाथ कवडे व डॉ. सुभाष देवकुळे लिखित ‘फ्लोरा ऑफ चांदोली नॅशनल पार्क’ तसेच वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी यांच्या ‘मैत्री सापांशी’ या पुस्तकांचे अनावरण झाले. कार्यक्रमात विक्रम पोतदार यांनी ‘जगभरातील वन्यजीव अधिवास’ या विषयावर व्याख्यान सादर केले.
वाईल्ड वॉच वन्यजीव छायाचित्र स्पर्धा या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी वन्यजीव छायाचित्रकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेसाठी ‘वन्यजीव आणि त्यांचे अधिवास’ हा विषय स्पर्धकांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विक्रम पोतदार व किशोर गुमास्ते यांनी केले. स्पर्धेत नितीन जैन, देवेंद्र पोरे व सौरभ तामणे यांना पारितोषिक मिळाले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एंप्रेस गार्डन येथे डॉ. श्रीनाथ कवडे व डॉ. सचिन पुणेकर यांनी नागरिकांसाठी वृक्ष परिचय कार्यक्रम घेतला. तसेच ‘शहरी जैव विविधता- दशा आणि दिशा’ या विषयावर आधारित चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले.या चर्चासत्रात डॉ. देशभूषण बस्तावडे, डॉ. शरद राजगुरु, डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे आदी मान्यवर सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी डॉ. दीपक सावंत व डॉ. सचिन पुणेकर यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी पर्वती येथे निसर्ग परिचय कार्यक्रम घेतला.