सराफी पेढीतील कर्मचाऱ्यावर चाकूने वार

पुणे : मुंबईहून दागिने घेऊन आलेल्या पुण्यातील एका सराफी पेढीतील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून त्याच्याकडील एक कोटी ४८ लाख रूपयांचे दागिने असलेली पिशवी चोरटय़ांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र, पाचूच्या माळा, हिरेजडित दागिने, कर्णफुले असा ऐवज होता.

याबाबत अजय मारूती होगाडे (वय २०,रा. कोळीवाडा, शीव, मुंबई) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील जव्हेरी बाजार येथील रांका ज्वेलर्स या सराफी पेढीत अजय हा शिपाई म्हणून कामाला आहे. या कार्यालयाचे व्यवहार पाहणारे सुभाष बिष्णोई यांनी पुण्याला दागिने नेण्याचे काम अजयकडे दिले होते. गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास चार मोठय़ा पाकिटात

दागिने घेऊन अजय दादरहून रेल्वेने पुण्याकडे यायला निघाला. एका पिशवीत ही सर्व पाकिटे ठेवण्यात आली होती.  मध्यरात्री सव्वाच्या सुमारास अजय पुणे रेल्वे स्थानकावर उतरला. फलाट क्रमांक सहा येथील प्रवेशद्वारातून तो बाहेर पडत होता. तेथील रिक्षा थांब्याच्या दिशेने जात असलेल्या अजयच्या मागावर असलेल्या चोरटय़ाने त्याला धक्का मारला आणि त्याच्याकडील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. अजयने त्यांना प्रतिकार केला. तेव्हा चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी अजयला मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. पिशवी हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

चेहरा रूमालाने झाकलेला

चोरटे मराठी-हिंदूीत बोलत होते. त्यांनी चेहरा रूमालाने झाकलेला होता, असे अजय होगाडे याने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. शुक्रवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.