पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन गणपती मंदिरात चोरी झाली आहे. शुक्रवारी पहाटेच्या मंदिरातील २५ तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतील रक्कम चोरील्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी याच मंदिरात चोरीची घटना घडली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले की, मंदिराच्या मुख्य मंडपात आज रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान तोंडाला मास्क लावून एकाने आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्याने बापाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे हार, एक मंगळ सूत्र, कंठी असे मिळून अंदाजे २५ तोळं सोने आणि दान पेटी मधील काही रक्कम चोरली आहे.
ही चोरी करत असताना आरोपीच्या चेहर्यावरील मास्क खाली आल्याने, त्याचा चेहरा दिसून आला आहे. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेची माहिती मिळताच आम्ही सर्वानी पाहणी केली. पोलिस देखील सर्व बाजूने तपास करीत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2021 1:02 pm