ठाणे, मुंबईसह परराज्यातील सराफी दुकानात चोरी

सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरून दागिने लंपास करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला गुन्हे शाखेने पकडले. या टोळीने मुंबई, ठाणे तसेच केरळ आणि गुजरात येथे सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

चेतन ऊर्फ राहुल बाबुराव कच्छवाह (वय २६, सध्या रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), सुचित्रा किशोर साळुंके (वय  ४५, रा. अकलूज, जि. सोलापूर), ज्योत्स्ना सुरज कच्छवाह (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, महालक्ष्मी मंदिराशेजारी, बिबवेवाडी), मंजिरी प्रशांत नागपुरे (वय ३५, रा. माऊली कॉम्प्लेक्स, सुखसागरनगर, बिबवेवाडी), कोमल विनोद राठोड (वय ३०, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत.

मुंढवा भागात गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून गस्त घालण्यात येत होती. सराफी दुकानातून दागिने चोरणारी टोळी केशवनगर भागात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावला आणि चोरटय़ांना पकडले.

पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा ११ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून कच्छवाह, नागपुरे, राठोड, साळुंके यांनी खरेदीच्या बहाण्याने दोन बांगडय़ा आणि सुवर्णहार चोरल्याची कबुली दिली. या टोळीने सोलापूर, मुंबई (दादर), केरळ तसेच गुजरात येथे दागिने खरेदीचा बहाणा करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी यापूर्वी पुणे शहरात चार गुन्हे केले होते. रत्नागिरी, लांजा, निपाणी येथील सराफी दुकानात चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर, सहायक निरीक्षक महादेव वाघमोडे, नांद्रे, लक्ष्मण शिंदे, माणिक पवार, शिवाजी घुले, प्रदीप सुर्वे, प्रदीप शितोळे, अजय खराडे, प्रवीण शिंदे, प्रगती नाईकनवरे, गीतांजली जाधव, संगीता जाधव, ननीता येळे यांनी ही कारवाई केली.