पुण्यात ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एल्गार परिषदे’स जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्या भाषणाचा व्हिडीओ आणि ऑडिओ आमच्याकडे आहे. त्या दोघांचे भाषण तपासले जात असून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी दिली.

या दोघांच्या भाषणाविरोधात अक्षय बिक्कड या व्यक्तीने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बाबीची तपासणी करण्यात येत असल्याचे सेनगावकर यांनी म्हटले आहे.

जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला का? या प्रश्नावर ते म्हणाले, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता कार्यक्रम झाल्यानंतर नववर्षाचा आणि त्यानंतर कोरेगाव भीमा येथील बंदोबस्त पोलिसांकडे होता. त्याचदरम्यान त्या ठिकाणी जाळपोळीची घटना घडली. तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बंद या चार दिवसाचा घटनाक्रम लक्षात घेता. या घटनेच्या सर्व बाबी तपासून पाहत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.