आपला स्पष्टवक्तेपणा आणि धडाकेबाज कामांमुळे नेहमीच चर्चेत असणारे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तोंडाला लावलेल्या वैशिष्टपूर्ण मास्कमुळे शनिवारी पुन्हा एकदा चर्चेत आले. निळ्या रंगाचा मास्क आणि त्यावर अॅटिट्यूड असे इंग्रजीतील शब्द यांमुळे पुण्यातील शासकीय बैठकीत आणि त्यानंतर पत्रकार परिषेदत त्यांची चर्चा होती.

जितेंद्र आव्हाड हे करोना आजारातून मागील महिन्यात बरे होताच त्यांनी कामाचा आणि बैठकांचा एकच धडका लावला आहे. पुण्यातील आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन इथल्या बैठकीत विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळीही त्यांनी आपला वैशिष्टपूर्ण मास्क परिधान केला होता.

पुण्यातील दौऱ्यात झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुकत शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव आदी उपस्थित होते.