महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चेच्या प्रश्नावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आव्हाड म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी बैठकांना एकत्रित बसत आहोत, प्रेमानं वागत आहोत. तसंच आम्ही सध्या चेतना मानसिकतेतून पुढे जात असल्याने मला तरी यात काही दिसत नाही.” तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सरकारच्या कारभारावरील टीकेवर आव्हाड म्हणाले, ‘आज करोना विषाणूचे जागतिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, राज्यातील विरोधीपक्ष नको त्या गोष्टीत राजकारण करू पाहत आहे, असं करून चालणार नाही.”

दरम्यान, भारत-चीन सीमेवर गलवाण खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांबाबत भाष्य करताना आव्हाड म्हणाले, “जर काहीच झालेलं नाही तर आपले २० सैनिक कसे मारले गेले? याच उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं. कुठंही आक्रमण झालं असं म्हणायला ते तयार नाहीत. आपली जमीन त्यांनी घेतली असंही म्हणण्यास तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले, हा प्रश्न उपस्थित राहतोच ना? तसेच देशाच्या सीमेवर १९६७ नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या सीमेवर प्राणघातक हल्ला झालेला नाही. कुठल्याही सैनिकाने प्राण गमावलेला नाही. मग आत्ताच्या घटनेची जबाबदारी कोणीतरी स्विकारायला हवी, सगळ्यांनीच हात वर केले आहेत. याचं उत्तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधान यांनी द्यायला हवं.”

“गलवाण व्हॅली आपलीच आहे त्यामुळं एक इंचही जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घ्यायला हवी. देशाच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा जेव्हा विषय येतो तसेच जेव्हा बाह्य राष्ट्रांकडून आक्रमण होतं तेव्हा आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे ही या देशाची शिकवण आहे. पण सत्यही समोर यायला पाहीजे ना, सत्य न सांगता हे सर्व अशक्य आहे,” अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.