स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : टाळेबंदीमुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटामुळे येत्या काही काळासाठी शासकीय पदभरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना धक्का बसला आहे. ‘आम्ही विनावेतन काम करायला तयार आहोत, पण पदभरतीवर बंदी घालू नका,’ अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

बराच काळ मेहनत करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देतात. मात्र, करोना संसर्गामुळे एमपीएससीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. सद्य:स्थिती पाहता, या परीक्षा कधी होतील या बाबत काहीच स्पष्टता नाही. त्यातच आता राज्य शासनाने पदभरती न करण्याचा निर्णय घेतल्याने शासकीय नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे स्वप्न धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जितेंद्र तोरडमल, महेश घरबुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ‘पदभरती न करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. बेरोजगारी वाढलेली असताना अशा निर्णयामुळे बेरोजगारी आणखी वाढत जाईल. राज्य संकटात आहे, तसे आम्हीही संकटात आहोत, तोवर आम्हाला पगार देऊ नका. पण आम्हाला नोकऱ्या द्या. असे मागणीत म्हटले आहे.

आयोगाने स्पष्टता द्यावी

ज्या पदांच्या जाहिराती या पूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांचे काय होणार, स्थगित केलेल्या परीक्षांचे काय होणार याची स्पष्टता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने द्यावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे यांनी केली आहे.

स्थगित केलेल्या परीक्षा आणि या पूर्वी रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसंदर्भात शासनाशी पत्रव्यवहार करून निर्णय घेतला जाईल.

– सुनील अवताडे, उपसचिव, एमपीएससी