भक्ती बिसुरे

आधुनिक जगात ‘रीडय़ूस, रीयूज आणि रिसायकल’ (वस्तूंचा वापर कमी करणे, त्यांचा पुनर्वापर करणे आणि त्यासाठी पुनप्र्रक्रिया करणे) हे परवलीचे शब्द झाले आहेत. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पिढय़ान पिढय़ांपासून जतन करण्यात आलेली ‘गोधडी’ ही या त्रिसूत्रीचे उत्तम उदाहरण आहे. गोधडी निर्मितीची कला जागतिक व्यासपीठावर पोहोचावी आणि गोधडी कलाकारांच्या कलेलाही ओळख मिळावी म्हणून ऋचा कुलकर्णी या पुणेकर तरुणीकडून ‘बियाँड क्विल्टिंग’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेदरलँड आणि महाराष्ट्रातील आघाडीच्या वस्त्र कलाकारांना एकत्र आणून गोधडी या संकल्पनेबाबत विचारमंथन व्हावे यासाठी पंधरा दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन ऋचाकडून करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डच आणि मराठी कलाकार पारंपरिक पद्धतीने गोधडी शिवणाऱ्या महिलांबरोबर संवाद साधणार आहेत. त्यांच्या कलेतील बारकावे आणि वैशिष्टय़ आत्मसात करून, त्यांचा वापर आपल्या वस्त्र कलेत करण्याबरोबरच त्यातून गोधडी शिवणाऱ्या कलाकारांना देखील रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा दुहेरी हेतू या आदानप्रदानातून साध्य करण्यात येणार आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या निवासी शिबिरात नेदरलँडमधील सिमॉन पोस्ट, मे एंगेलगीर आणि रिचर्ड निसेन तर महाराष्ट्रातील करिश्मा शहानी, स्टुडिओ अल्टरनेटिव्ह्ज आणि ऋचा कुलकर्णी यांचा सहभाग आहे.

ऋचा म्हणाली, नेदरलँड येथे जाण्याआधी ‘क्विल्ट कल्चर’ या समूहाखाली गोधडी कलेत पारंगत असलेल्या महिलांना एकत्र आणून गोधडीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याला जगातील अनेक देशांतील नागरिकांनी प्रतिसाद दिला. मागील काही वर्षे परदेशात वास्तव्य करताना, डिझाइनिंगच्या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे कलाकार करत असलेले काम आणि त्यातील वैविध्य पाहता आले. या कलाकारांना गोधडी हा कलाप्रकार पाहता यावा यासाठी ‘बियाँड क्विल्टिंग’ हा प्रयत्न आहे.

आपल्या संस्कृतीत ‘जुने ते सोने’ हे केवळ बोलण्यापुरते नाही. ते कृतीतही उतरवले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोधडी शिवण्याची कला. पंधरा दिवसांच्या निवासी शिबिरात या कलेबाबत विचारमंथन व्हावे, आधुनिक स्वरूपातील तिच्या वापराबाबत संशोधन आणि प्रयोग व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही ऋचा सांगते.

अनेक जागतिक पुरस्कारांवर आपले नाव कोरलेली डच वस्त्र कलाकार सिमॉन पोस्ट म्हणाली, जुन्या कापडाच्या तुकडय़ांचा वापर करून शिवल्यामुळे ‘क्विल्टिंग’ हे जुनाट आणि विटके समजले जाते, याचे वाईट वाटते. महाराष्ट्रातील ‘क्विल्ट’ कलेचा वापर आधुनिक प्रकारे करून त्याचा लाभ गोधडी कलाकारांसाठी कसा करता येईल याबद्दल उत्सुकता घेऊन या शिबिरात सहभागी होत आहे.