वेगळे राहण्याच्या अट्टाहासामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असून, आई- वडिलांची भरती वृद्धाश्रमात केली जात आहे. त्यातून वृद्धाश्रमात वाढणारी गर्दी अस्वस्थता वाढविणारी आहे, अशी खंत कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली.
खडतर परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या आठ मातांना आदिशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने शाहू महाराज यांच्या हस्ते ‘आऊसाहेब पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर, प्रतिष्ठानचे दत्तात्रेय पवार आदी त्या वेळी उपस्थित होते. तानुबाई खाडे, बदामबाई बोरा, चित्रा गोखले, नलिनी पवार, कमल चोरडिया, वसुधा शिकारपुरे, वसल्लम्मा दुईइराज व बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या गीता अय्यंगार यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाहू महाराज म्हणाले,की बदलत्या काळामध्ये कुटुंबाचे वेगळे चित्र पहायला मिळत आहे. वृद्धाश्रमात वाढणारी गर्दी चिंताजनक आहे. मुलांनी आपल्या आई- वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य बजावले पाहिजे. भारतातील संस्कृती आई- वडिलांना मानणारी आहे. पण, संस्कारातील कमतरतेमुळे संस्कृतीचे चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. आई ही आपल्या सर्वात जवळची व्यक्ती असते. आईने दिलेले संस्कारच पुढे महत्त्वाचे ठरत असतात. सर्वानी एकत्र कुटुंब म्हणून राहिल्यास समाजात एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण वावरू शकतो. बेडेकर म्हणाले,‘‘शिवरायांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी जिजाबाईंनी निर्माण केली. जगात कर्तृत्ववान महिला खूप आहेत. त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.’’