एका खोलीत एखादे आख्खे शहर सामावले तर? तेही खऱ्या वाटाव्या अशा हालत्याचालत्या प्रतिकृतींचे! रेल्वेगाडय़ांचा इतिहास रंजकपणे उलगडत एका काल्पनिक शहराची सफर घडवणारे संग्रहालय भाऊ जोशी या अभियंत्याने वीस वर्षांपूर्वी पुण्यात उभारले आणि पुण्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये हे संग्रहालय बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी खेचू लागले.

आपल्याकडे एकूणातच छंद फारसे फुलत नाहीत. शाळेत असेपर्यंत बहुतेक जण थोडय़ाफार प्रमाणात छंद जोपासतात आणि त्यानंतर तो छंद फार पुढे जाऊ शकत नाही. त्यातही रेल्वेच्या प्रतिकृती जमवण्याचा छंद म्हणजे आपल्याकडे अजूनही नवीनच म्हणायला हवा. पुण्यातील एका कल्पक अभियंत्याने अशा प्रतिकृती जमवल्या आणि डोके लढवून एका खोलीत छोटेसे हलतेचालते शहरच उभे केले. हेच ते ‘जोशी रेल्वे संग्रहालय’. या संग्रहालयाने केवळ पुण्यातीलच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही कायम आकर्षित केले आहे.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत
private bus fare mumbai to konkan marathi news, mumbai to konkan private bus marathi news
मुंबईस्थित कोकणवासीय शिमग्यानिमित्त गावी रवाना, खासगी बस कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणी

प्रतिकृती जमवण्याचा आणि स्वत: देखील बनवण्याचा छंद जोपासण्यासाठी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे देणाऱ्या भाऊ जोशी यांना सुरुवातीपासूनच हलत्याचालत्या प्रतिकृतींचे आकर्षण होते. व्यवसायानेही अभियंता असलेल्या भाऊंना प्रत्यक्षातील वस्तूंची मापे लक्षात घेऊन त्या मापांशी अचूक जुळतील अशा (प्रपोर्शनेट) लहान प्रतिकृती बनवण्यास आवडे. बालपणापासून ते दिवाळीत अतिशय कल्पक किल्ले करत. दोऱ्या किंवा तारा आणि कप्पी (पुली) वापरून ते हलत्या वस्तूंची योजना करून किल्ल्यांना जिवंतपणा देत. नोकरीसाठी परदेशी गेले असताना त्यांनी रेल्वेगाडय़ांच्या प्रतिकृती पाहिल्या आणि हा छंद त्यांच्या मनाने घेतला.

‘रेल्वेगाडय़ांच्या लहान प्रतिकृती आयात करण्यावर १९९७ पर्यंत बंदी होती. असे का, याचे कारण माहिती नाही, पण त्यामुळे भारतात दुकानात अशा प्रतिकृती मिळत नसत. ओळखीचे कुणी परदेशी गेले की त्यांच्याबरोबर एखादी प्रतिकृती भाऊंना मिळू शकत असे. असाच त्यांचा संग्रह होत गेला. प्रत्यक्षातील वस्तूची मापे आणि त्याच्या लहान प्रतिकृतीची मापे जुळणे हे या संग्रहालयाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे या वस्तू खऱ्या वाटतात,’ असे भाऊ जोशींचे पुत्र डॉ. रवी जोशी सांगतात.

ऐंशीच्या दशकात भाऊंनी शहराची लहान प्रतिकृती (मिनिएचर सिटी) बनवण्याचे ठरवले. त्याची ठिकठिकाणी प्रदर्शने भरवावीत असा त्यांचा विचार होता. १९८२ मध्ये गोखले सभागृहात आणि त्यानंतर मुंबईतही हे ‘मिनिएचर सिटी’चे प्रदर्शन त्यांनी भरवले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण प्रत्येक प्रदर्शनासाठी संपूर्ण प्रदर्शन घेऊन जाणे ही खर्चिक आणि वेळखाऊ बाब होती. मग रेल्वेच्या प्रतिकृतींचे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोथरूडमध्ये जी. ए. कुलकर्णी मार्गावर एका सभागृहात हे प्रदर्शन उभारण्यात आले आणि १ एप्रिल १९९८ पासून ते लोकांना पाहता येऊ लागले. याच वर्षी भाऊ जोशींचे निधन झाले. या संग्रहालयाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. दरवर्षी १५ हजार पर्यटक या खासगी संग्रहालयाला भेट देतात. राज्यातील विविध जिल्ह्य़ातून येणारे पर्यटक पुण्यात आल्यावर आवर्जून या ठिकाणी येतात.

या संग्रहालयात एक आख्खे हलतेचालते छोटे शहर आणि त्यात रेल्वेच्या निरनिराळ्या प्रतिकृती आहेत. वाफेवरची आगगाडी, डिझेलवर चालणारी रेल्वेगाडी, वेगवान ‘इंटरसिटी एक्सप्रेस’, लोकल शटल ट्रेन, हँगिंग मोनोरेल, रोप-रेल्वे या प्रतिकृती पाहण्याजोग्या आहेत. लहानांना आणि मोठय़ांनाही आकर्षक वाटेल अशी गोष्ट म्हणजे या छोटय़ाशा शहरात वेगवेगळ्या रेल्वेगाडय़ा पाहत केल्या जाणाऱ्या भ्रमंतीला एका रंजक गोष्टीत गुंफले आहे. रेल्वेगाडय़ांबरोबर टॉवरवरचे वर-खाली होणारे हलते उपाहारगृह, सर्कसचा छोटा हलता सेट या गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या. त्याबरोबर ज्या दिवशी देशात पहिली पॅसेंजर रेल्वेगाडी धावली त्या रात्री (म्हणजे १६ एप्रिल १८५३ रोजी) आकाशात असलेले ग्रहताऱ्यांचे मनोहर दृश्य या शहराच्या छतावर साकारले आहे.

आता भाऊ जोशींचे पुत्र रवी जोशी हे संग्रहालय सांभाळतात. या संग्रहालयातूनच गेल्या दहा वर्षांत जोशींचा रेल्वेच्या लहान प्रतिकृती बनवण्याचा व्यवसाय विकसित झाला आहे. रेल्वे प्रतिकृती तयार करून त्यांनी भारतीय रेल्वे आणि स्विस रेल्वेला दिल्या आहेत. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘कंट्रोल पॅनेल’वरील बटणे दाबून चालवता येणाऱ्या छोटय़ा रेल्वेगाडय़ांची प्रतिकृती वापरली गेली होती. तीही जोशींनी बनवून दिली. रेल्वेव्यतिरिक्त कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अजस्त्र यंत्रांच्या लहान प्रतिकृतीही ते बनवून देतात. अशी संग्रहालये पाहून या प्रकारचे छंद देशातही रुजावेत आणि कल्पकतेने जोपासले जावेत, अशी अपेक्षा रवी जोशी व्यक्त करतात.

sampada.sovani@expressindia.com