तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पत्रकारितेत आज खूप मोठे बदल होत आहेत. काही वृत्तपत्रांमध्ये तर हल्ली संपादकीयदेखील दिसत नाही. वृत्तपत्राचे पहिले पान म्हटले की वाचकांच्या मनात जी प्रतिमा असते तसे पहिले पान उद्या दिसेलच अशीही परिस्थिती राहिलेली नाही. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात असे कितीही बदल होत असले, तरी पत्रकारिता ही समाजाच्या हिताचीच असली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
वरुणराज भिडे मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार तर पत्रकार गुरुबाळ माळी, सुनील राऊत आणि सरिता कौशिक यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. भिडे यांच्या स्मृतिनिमित्त गेली पंधरा वर्षे हे पुरस्कार देण्यात येत आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे, पत्रकार उदय निरगुडकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष विलास जोशी यांनी स्वागत, अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक आणि सूर्यकांत पाठक यांनी सूत्रसंचालन केले.
चांगल्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत याची काळजी पत्रकारितेने घ्यावी आणि पत्रकारिता ही समाजाच्या हितासाठीच असली पाहिजे, असे पवार यांनी यावेळी सांगितले. ग्राहकांच्या बदलत्या वाचनसवयीचा प्रश्न आज पत्रकापरितेपुढे आहे आणि जनमानसाला हलवून टाकेल अशी विश्वासार्हता लेखणीत निर्माण करावी लागेल, असे डॉ. निरगुडकर यांनी सांगितले. पत्रकाराची भूमिका जागल्यासारखी असली पाहिजे. जे चुकत असेल ते सांगण्याची जबाबदारी पत्रकारितेवर आहे, असे बागाईतकर म्हणाले. डॉ. सतीश देसाई यांनी आभार मानले.