‘ज्यांना माध्यमांपर्यंत पोहोचता येते, त्यांचीच बातमी होते. मात्र, त्याचवेळी सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे पत्रकारितेसाठी एक नवे व्यासपीठ तयार झाले आहे. सोशल मीडियावरील पत्रकारिता ही अधिक विश्वासार्ह होत चालली आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार चित्रा सुब्रमण्यम डय़ुएला यांनी शनिवारी प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार आणि द इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचे माजी संपादक प्रकाश कर्दळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रकाश कर्दळे मित्रमंडळाच्यावतीने प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. यावर्षी या व्याख्यानाचे सातवे वर्ष होते. यावर्षी ‘माध्यमे, समाज आणि प्रशासकीय कारभार’ या विषयावर चित्रा सुब्रमण्यम डय़ुएला यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकाच्या लेखिका विनिता कामटे, पत्रकार आनंद आगाशे, विनिता देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी सुब्रमण्यम म्हणाल्या, ‘ज्यांना माध्यमांपर्यंत पोहोचता येते, त्यांचीच बातमी होते. त्यामुळे आपले उद्देश साध्य करण्यासाठी माध्यमांचा वापर करणे किंवा विशिष्ट उद्देशाने बातम्या पेरल्या जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही या सर्व व्यवस्थेबाबत निराश झाला आहेत. मिळालेल्या प्रत्येक माहितीची बातमी करण्यापूर्वी खातरजमा करून घेणे हे बातमीदाराचे कर्तव्य आहे. मिळालेल्या माहितीची दोन स्वतंत्र यंत्रणांकडून खातरजमा करून घेणे आणि विषयाचा पूर्णपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. मात्र, आता सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि इंटरनेटमुळे पत्रकारितेचे एक प्रभावी माध्यम निर्माण झाले आहे आणि ते काही प्रमाणात विश्वासार्हसुद्धा आहे.’ इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत सुब्रमण्यम म्हणाल्या, ‘सध्या भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांची परिस्थिती ही आणखीच गंभीर आहे. प्रत्येक वाहिनीला काही ठराविक लोक हे प्रत्येक विषयावर बोलत असतात आणि एकदा ती चर्चा संपली की त्या कुणालाच त्या विषयाशी फारसे कर्तव्य नसते.’