News Flash

‘लोकसत्ता’च्या वार्ताहरास मारहाण करणाऱ्या नीलेश मोरे यांची पोलीस कारकीर्द वादग्रस्तच

उपअधीक्षक नीलेश मोरे यांनीही चाटे यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले होते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलीस शिपायाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

मांजरी येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात वार्ताकनासाठी गेलेले ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना मारहाण करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांची कारकीर्द वादग्रस्तच असल्याचे प्रकरण समोर आले आहे. मोरे यांच्या मुजोरीमुळे बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चाटे यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल आहे. अशा वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे.

पोलीस नाईक संतोष हरिश्चंद्र चाटे यांनी गेल्या वर्षी अंबाजोगाईतील तत्कालिन पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी चाटे यांच्या पत्नी स्वाती संतोष चाटे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक एस. बी. पोळ, सहाय्यक निरीक्षक बी. डी. गोरसे, योगेश गुजर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी नीलेश मोरे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून जामीन मिळविला. याप्रकरणाचा तपास सुरू असताना मोरे आणि अन्य आरोपींनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी याचिकाही दाखल केली होती. त्यास फिर्यादी स्वाती चाटे यांनी विरोध केल्यानंतर याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होऊन संबंधित याचिका फेटाळून लावण्यात आली.

संतोष चाटे हे १३ मार्च २०१६ रोजी अंबाजोगाई शहरात रात्री गस्त घालत असताना स्थानिकाशी झालेल्या वादात त्यांनी योगेश गुजर नावाच्या व्यक्तीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली होती. मात्र, त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस खात्यातूनच चाटे यांच्यावर दबाव सुरू झाला. पोलीस निरीक्षक पोळ, बोरसे यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. उपअधीक्षक नीलेश मोरे यांनीही चाटे यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले होते. याप्रकरणी स्थानिक वर्तमानपत्रात बातमीही छापून आली होती. मोरे आणि अन्य आरोपींनी माझ्या पतीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती, असे स्वाती चाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. माने यांची कार्यपद्धती वादग्रस्त असून पोलीस कर्मचारी तसेच सामान्यांशीही ते अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या आहेत.

नीलेश मोरेंवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे

‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना मारहाण करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. नीलेश मोरे यांनी मुजोरपणे ज्ञानेश भुकेले यांना शनिवारी मारहाण केली होती. दमटाटी करून भुकेले यांच्याकडून माफीनामाही लिहून घेतला होता. ही घटना गंभीर असून, यासंदर्भात मोरे यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:33 am

Web Title: journalists demanding action against acp nilesh more
Next Stories
1 शिक्षण आणि न्यायव्यवस्थेत बदलासाठी आराखडा आवश्यक
2 पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
3 मेट्रो स्टेशनसाठी जागा देण्यास पुणे महानगरपालिकेची तयारी
Just Now!
X