पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याची व त्यासाठी लवकरच अधिसूचना काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली आणि शहरातील वातावरण एकदम ढवळून निघाले. मतदारांना दिलेला शब्द पाळल्याचे सांगत भाजपने पिंपरीत प्रचंड जल्लोष केला. तर, हा निर्णय होत असताना आपणच कसा पाठपुरावा केला, याचे श्रेय घेण्याची आमदार-खासदारांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विषयावरून गेल्या काही वर्षांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने हा प्रश्न सोडवला नाही, त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला. प्राधिकरणाच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आठवडय़ात अधिसूचना काढण्याची घोषणा केली. मात्र, त्यादृष्टीने कार्यवाही केलीच नाही. सत्तेत येताच हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून दीड वर्षांत अपेक्षित निर्णय होत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तसेच या प्रश्नाचा सुरूवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सतत टीका होत होती. तथापि, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आणि शहरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर त्याचे श्रेय घेण्यासाठीची चपळाई भाजप कार्यकर्त्यांनी दाखवली. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे आभार मानले. तर, िपपरी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अपक्ष आमदार महेश लांडगे यांनीही स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बांधकामे नियमित करण्याचा शब्द पाळणारा आमदार, असे सांगत लांडगे समर्थकांनी या निर्णयाचे श्रेय महेश लांडगे यांनाच देण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत जगताप व लांडगे समर्थकांकडून ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअप’वर अघोषित श्रेययुध्द सुरू होते. स्वतंत्रपणे निवेदन काढून खासदार अमर साबळे यांनीही त्यात उडी घेतली. साबळे म्हणाले,‘‘जाचक अटींमुळे ही बांधकामे अनधिकृत ठरली होती. व्यापक हित पाहून नियमात बदल करण्याची भूमिका भाजपने घेतली व दिलेला शब्द पाळला.’’ आमदार जगताप म्हणाले,की मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शहरातील ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची जवळपास ६५ हजार अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सततच्या पाठपुराव्याला व जनतेच्या लढय़ाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे यश मिळाले. आमदार लांडगे म्हणाले,की याप्रश्नी सतत पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.