हिंजवडी परिसरातील अलार्ड महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सोमवारी ‘एसएससी’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा वीजपुरवठा खंडीत झाल्याने तसेच अनेकदा पेपर देणारे कॉम्प्युटर बंद पडल्याने रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज ही परीक्षा घेतली जाणार होती, मात्र आज देखील ही परीक्षा होऊ न शकल्याने, परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजचा पेपर रद्द झाल्याचा मेसेज परीक्षार्थ्यांच्या मोबाइलवर आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकारामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे. कालप्रमाणे आज देखील परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यावर परीक्षा केंद्राच्या आवारात परीक्षार्थ्यांनी महापोर्टल तसेच महाविद्यालय प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी केली. महापोर्टल रद्द करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने आता आम्ही काय करायचे? ज्यांचे नातेवाईक अथवा कोणी पुण्यात नाही त्यांनी कोणाकडे राहायचे? असे प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आले. तसेच, संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक काढावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.