‘‘माझ्या मुलाला ९२ टक्के मिळालेत, हे गुण कमी आहेत का? तरीही मला अमुक एक महाविद्यालय का मिळत नाही?..’ असे प्रश्न आणि त्यावर ९२ टक्क्य़ांचे पन्नास तरी अर्ज आलेत अशा उत्तराबरोबर पालकांपुढे ठेवला जाणारा अर्जाचा गठ्ठा.’ असे संवाद अकरावीच्या प्रवेश केंद्रावर रंगताना दिसत आहेत. फुगलेल्या निकालाने विद्यार्थी आणि पालकांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयेच हवी असल्यामुळे आता महाविद्यालये आणि शाळा विद्यार्थ्यांना उत्तरे देताना थकून गेल्या आहेत. हव्या त्याच महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, म्हणून निराश झालेल्या विद्यार्थ्यांची समुपदेशकांकडेही गर्दी वाढते आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येबरोबरच विशेष श्रेणी आणि पहिल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धाही वाढली. अमुक एका टक्क्य़ांच्या वर गुण मिळाले की अमुक एक महाविद्यालय सहज मिळेल.. अशा पालक आणि विद्यार्थ्यांच्या समजुतींना प्रवेश प्रक्रियेत तडा गेलेला दिसत आहे. मिळालेल्या गुणांचा आनंद तर आता ओसरलाच आहे. पण आपल्यासारखेच किंवा आपल्या पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा पाहून विद्यार्थी निराश होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जी कथा सध्या अकरावीच्या प्रवेशाची आहे. तीच काही अंशी प्रथम वर्षांच्या पदवी प्रवेशाचीही आहे. शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयांच्या कट ऑफ गुणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २ ते ३ टक्क्य़ांचीच वाढ दिसते आहे. मात्र, आतापर्यंत मधल्या फळीत असणाऱ्या म्हणजे साधारण ७५ ते ८५ टक्क्य़ांमध्ये असणाऱ्या महाविद्यालयांचे कट ऑफ वाढल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत निकाल मनासारखा लागला नाही म्हणून निकालानंतर समुपदेशकांकडे गर्दी होत असे. मात्र, आता चांगले गुण, काही वेळा अपेक्षेपेक्षाही अधिक गुण दिसत असतानाही हव्या त्या महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकत नाही, म्हणून समुपदेशकांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढते आहे.
याबाबत विद्यार्थी समुपदेशन करणाऱ्या राधा शर्मा यांनी सांगितले, ‘‘चांगले गुण दिसत असल्यामुळे मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, मिळालेले गुणही स्पर्धेत कमी पडत असल्याचा मुलांनाही धक्का बसतो आहे. आतापर्यंत खूप गंभीर स्वरूपाचे नैराश्य असलेले विद्यार्थी आढळले नाहीत. मात्र, एवढे गुण मिळूनही उपयोग नाही, अशी विद्यार्थ्यांमध्ये तयार होणारी भावना कमी करण्यासाठी त्यांना समुपदेशन करावे लागते.’’