26 September 2020

News Flash

लाल विटांच्या जागी आल्या ‘फ्लाय अॅश’च्या विटा!

राज्यात मुंबईखालोखाल पुणे हे फ्लाय अॅशपासून बनवलेल्या विटांची मोठी बाजारपेठ ठरते आहे. पुणे जिल्ह्य़ात सुमारे १०० ते १२५ उद्योजक फ्लाय अॅशपासून विटा बनवण्याचा व्यवसाय करत

| February 18, 2014 03:17 am

पर्यावरणाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणारी ‘फ्लाय अॅश’ वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग सध्या चांगलाच भरात आहे. विशेष म्हणजे राज्यात मुंबईखालोखाल पुणे हे फ्लाय अॅशपासून बनवलेल्या विटांची मोठी बाजारपेठ ठरते आहे. पुणे जिल्ह्य़ात सुमारे १०० ते १२५ उद्योजक फ्लाय अॅशपासून विटा बनवण्याचा व्यवसाय करत असून या विटांनी लाल मातीच्या विटांची बाजारपेठ जवळजवळ ९० टक्के काबीज केल्याचे निरीक्षण काही उत्पादकांनी नोंदवले.
राज्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणी फ्लाय अॅशपासून विटा बनवण्याचा उद्योग चालतो. फ्लाय अॅशपासून सध्या विटा आणि लाइट वेट ब्लॉक्स ही दोन उत्पादने बनवली जातात. यातील लाइट वेट ब्लॉक्सना वाढती मागणी आहे. ‘शिर्के ब्रिक्स’ या उत्पादक कंपनीचे मालक प्रीतम शिर्के म्हणाले, ‘‘फ्लाय अॅश विटांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी फ्लाय अॅशच्या विटांना चांगली मागणी होती. सध्या विटांचा वापर कमी होऊन मोठय़ा आकाराच्या हलक्या विटांचा (ब्लॉक्स) वापर वाढला आहे. या हलक्या विटाही फ्लाय अॅशच्याच बनवलेल्या असतात. फ्लाय अॅशची नेहमीची वीट साधारणपणे ९ इंचांची असते, तर लाइट वेट ब्लॉक २ फूट लांबीचे असतात. हे ब्लॉक्स वापरून बांधकाम लवकर होते आणि सिमेंटही तुलनेने कमी लागते. त्यामुळे ते फ्लाय अॅश विटांपेक्षा थोडे महाग असले तरी त्यांचा वापर वाढला आहे.’’
लाल मातीपासून बनवलेल्या विटांचा बांधकामासाठी होणारा वापरही खूप कमी झाला असून सुमारे ९० टक्के बांधकामात फ्लाय अॅश विटा किंवा ब्लॉक्स वापरले जातात. ‘स्नेह इंडस्ट्रीज’ या वीटा व ब्लॉक्स उत्पादक कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह साईप्रसाद मोरालवार म्हणाले, ‘‘लाल विटांचे बांधकाम जवळपास बंद झाले असून काही जुन्या बांधकामांमध्ये किंवा वैयक्तिक पातळीवर करून घेतल्या जाणाऱ्या बांधकामांमध्येच लाल विटा वापरल्या जात असल्याचे दिसून येते. लाल विटा आणि फ्लाय अॅशच्या विटा यांची किंमतही जवळपास सारखी आहे. २ ते ३ वर्षांपूर्वी केवळ मुंबई हीच फ्लाय अॅशच्या विटांची बाजारपेठ समजली जात असे. मात्र आता पुणे, औरंगाबाद, नाशिक या बाजारपेठाही झपाटय़ाने विस्तारत आहेत.’’
 
‘फ्लाय अॅश’ म्हणजे काय?
औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे ‘फ्लाय अॅश’. ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानीकारक ठरते. ही राख कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडण्यापूर्वीच ती काही विशिष्ट प्रकारच्या गाळण्यांचा वापर करून साठवली जाते. हलक्या विटा बनवण्यासाठी या राखेचा वापर होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 3:17 am

Web Title: just after mumbai pune captured fly ash bricks market becomes
Next Stories
1 ग्राहक मंचाचा आदेश न पाळल्याबद्दल ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला कैदेची शिक्षा
2 म. श्री. दीक्षित यांचे निधन
3 दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यमंडळाकडून समुपदेशन कक्ष
Just Now!
X