शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरीक्षकांनी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सोनसाखळी चोरी झालेल्या ठिकाणी पोलीस उपायुक्तांनी स्वत: भेट देऊन पाहणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांवर पोलीस आयुक्तांनी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी रात्री शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनांची चौकशी केली होती. या नाकाबंदीच्या ठिकाणाला पोलीस आयुक्तांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली. याबाबत पाठक यांनी सांगितले की, पुणे शहरातील सोनसाखळी चोरी हा
महत्त्वाचा गुन्हा आहे. गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी गस्तीवरील दोन पोलिसांना पाठविले जाते. ते त्या ठिकाणी जाऊन काय करणार. त्यामुळे आता या ठिकाणी स्वत: पोलीस उपायुक्तांनी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबरोबरच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनीच करावा, असे आदेशही दिले आहेत. तसेच, शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. यासाठी खास वीस मोटारी ठेवण्यात आल्या आहेत. निश्चित सोनसाखळी चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी कसून प्रयत्न केले जातील.
पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना मीरा बोरवणकर यांनी देखील सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी कसून प्रयत्न केले होते. त्यांनी देखील या गुन्ह्य़ाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनीच करावा, असे आदेश दिले होते. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर या आदेशाचे पालन झाले नाही. आता पुन्हा नवीन पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.