नारायण पेठेच्या कबीर बाग परिसरात एका घरात पती-पत्नी आणि त्यांच्या बावीस वर्षे वयाच्या मुलीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचे मृतदेह घरात आढळून आले. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेगडी पेटविल्यामुळे धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भगवान धोंडिबा घारे (वय ५५), त्यांची पत्नी मंगला (वय ५०) आणि मुलगी पौर्णिमा (वय २२, रा. कबीरबाग, नारायण पेठ) असे मृत्यू झालेल्या तिघांचे नाव आहे. घारे यांचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय असून ते दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहण्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारे यांच्या दुकानात काम करणारे कामगार सकाळी आठच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी घरी आले. कामगारांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. पण, दरवाजा न उघडल्यामुळे घारे यांच्या मुलाला दूरध्वनी करून बोलावून घेतले. मुलाने घारे यांचा मोबाईल फोन लावून पाहिला, पण त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढून खिडकीतून घरात प्रवेश केला. मात्र, आतील खोली बंद होती. या खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घारे हे पलंगावर, तर मुलगी व तिची आई हे खाली अंथरुणावर झोपलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना तत्काळ उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नारायण पेठ पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना कोळशाची शेगडी पेटविल्याचे आढळून आले. या शेगडीतील धूर साचून राहिल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी सांगितले. नारायण पेठेतील विजय मारुती चौकात घारे यांचे जुने घर आहे. त्यांनी कबीरबाग येथे जागा घेऊन घर बांधल्यानंतर आठ महिन्यांपूर्वी ते या ठिकाणी राहण्यास आले होते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून, मुलगा दररोज रात्री जुन्या घरी झोपण्यासाठी जात होता.
जपानला जाण्याचे तिचे स्वप्न अपुरे!
भगवान घारे यांची मुलगी पौर्णिमा हिने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जपानी भाषेचेही शिक्षण घेतले होते. ती काही दिवसांनी नोकरीसाठी जपानला जाणार होती. त्यासाठी तिने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट आल्यानंतर ती जपानला जाणार होती, अशी माहिती तिच्या शेजारी राहणारे सचिन गरुड यांनी दिली. या घटनेमुळे पौर्णिमाचे जपानला जायचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले.