विद्रोही सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या कबीर कला मंचवर शासनाने नक्षलवादी असल्याचा आरोप करीत त्यांच्या सदस्यांना अटक केली आहे. हे कृत्य लोकशाही विरोधी असून अटक केलेल्या सदस्यांना सोडून देण्याची मागणी कबीर कला मंच बचाव समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, आनंद पटवर्धन, अभिजित वैद्य, सीमंतिनी धुरू, दीपक ढेंगळे, ज्योती जगताप आणि विलास वाघ उपस्थित होते. या वेळी भाई वैद्य म्हणाले की, जहाल विचार मांडणे, लेख लिहणे, विद्रोही साहित्य असणे म्हणजे नक्षलवादी होऊ शकत नाही. कबीर कला मंचचे सदस्य जहाल गीते गात भूमिका मांडत क्रांतीचा पुरस्कार करतात, म्हणून त्यांना पकडण्यात आले आहे. हे कृत्य लोकशाहीविरोधी असून शासन हे सूडबुद्धीने करीत आहे. त्यामुळे अटक केलेले सचिन माळी, शीतल साठे, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना तत्काळ सोडावे. पोलिसांनी त्यांच्यावर खोटे पुरावे सादर केले आहेत. त्यांना जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात जाणार आहोत.
कबीर कला मंचचा सदस्य दीपक ढेंगळे याने सांगितले की, आम्ही नक्षलवादी नसून लोकशाही मानतो. कुपोषण, शेतकरी आत्महत्या या विरोधात गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहोत. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा वारसा चालविणे हा नक्षलवाद असेल तर हो, आम्ही आहोत. पुरोगामी चळवळीला सांस्कृतिक प्रबोधन पुरवित हे आमचे धोरण राहील. ज्योती जगताप हिने सांगितले की, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून न्याय मिळेल ही अपेक्षा आहे.