सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात ‘कलाग्राम’ उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी सदुसष्ट लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून मांजरी बुद्रुक येथील पाणी पुरवठा योजनेला तसेच अन्यही काही कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. विविध राज्यांच्या संस्कृतीचे तसेच कलाविष्काराचे दर्शन या प्रकल्पातून घडवण्याचा उद्देश आहे. त्यासाठी सदुसष्ट लाखांच्या खर्चाला समितीने मंजुरी दिल्याचे कर्णे गुरुजी यांनी सांगितले. मांजरी बुद्रुक गावासाठी पाणी योजना राबवण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली असून बेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात महापालिका दहा कोटींचा हिस्सा उचलणार आहे. या खर्चालाही समितीने एकमताने मंजुरी दिली. महापालिकेत आणखी  चौतीस गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यात मांजरीचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
भामा आसखेड धरणातून पाणी
भामा आसखेड धरणातून नगर रस्ता भागात पाणी आणण्यासाठी जलवाहिनी टाकणे, पंपहाऊस बांधणे, संपवेल बांधणे आदी कामांच्या साठ कोटींच्या खर्चालाही स्थायी समितीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. भामा आसखेड धरणातून प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर पाणी आणण्याची योजना मंजूर झाली असून त्यासाठीची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. केंद्र सरकारच्या नेहरू योजनेत ही योजना मंजूर झाली आहे. शहरातील दोन हजार एकशेपन्नास रिक्षांना सीएनजी किट बसवण्यासाठी अनुदान देण्याचाही प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असून त्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रस्ते खोदून केबल टाकण्यासाठी परवानगी मागणारे जे प्रस्ताव येतात त्यात मुंबईच्या धर्तीवर मायक्रोट्रेचिंग पद्धतीने रस्ते खोदाई करण्याचे प्रस्ताव येतात. या पद्धतीत रस्त्याचे नुकसान कमी होते. त्यामुळे एक लाख रुपये प्रतिकिलोमीटर या दराने अनामत रक्कम स्वीकारून या प्रस्तावांना मान्यता देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

 
स्थायी समितीचे विविध निर्णय
– मांजरी बुद्रुकच्या पाणी योजनेसाठी दहा कोटी
– रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान देण्यास मंजुरी- खर्च दोन कोटी
– टॉवर उभारणीसाठी चार चौरसमीटरला २,८५० रुपये शुल्क
– केबल टाकण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर रस्ते खोदाईला मंजुरी
– सादरीकरण न झाल्यामुळे लाईट रेल्वेचा प्रस्ताव पुढे ढकलला