पाण्याचा पंप आणि पिठाच्या गिरणीसारखी यंत्रे स्नायूशक्तीवर कशी चालवली जातात याचे प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. ‘न्यू- इंग्लिश स्कूल रमणबाग’ने शाळेच्या आवारातच राबवलेल्या ‘कलाग्राम- ऊर्जा उद्याना’त स्वत:च सायकल चालवून जमिनीतून खेचून घेतलेले पाणी बागेत फवारण्याची मजा विद्यार्थी घेत आहेत.
शाळा समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आनंद भिडे, ज्येष्ठ माजी विद्यार्थी बापूराव घाटपांडे या वेळी उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून शाळेत सुरू असलेली कलाग्राम ऊर्जा उद्यानाची उभारणी पूर्ण होत आली असून विद्यार्थी दर आठवडय़ाला दोन तास या उद्यानात विविध उपक्रम करत आहेत. विद्यार्थ्यांना बागेत बसून चित्रे काढण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी उद्यानात प्राण्यापक्ष्यांची फायबरची शिल्पे आणि धबधबा बसवण्यात आला आहे. ही शिल्पे शाळेचे कला शिक्षक जयंत टोले यांनी साकारली आहेत. तसेच स्नायू- ऊर्जेवर चालणारी यंत्रे विद्यार्थ्यांना चालवून पाहता यावीत यासाठी जमिनीतून पाणी खेचून घेणारी सायकल, बागेला पाणी फवारण्यासाठीचा ‘सायकल पंप’, स्नायूशक्तीवर धान्य दळणारी गिरणी अशी उपकरणे उद्यानात बसवण्यात आली आहेत.

शाळा पूर्णत: सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय
शाळेची विजेची गरज पूर्णत: सौर ऊर्जेद्वारे भागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे किरण शाळिग्राम यांनी सांगितले. शाळेच्या गच्चीवर सोलर पॅनेल उभी करून त्याद्वारे १७५ ते २०० किलोव्ॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सध्या शाळेला दरमहा सुमारे ५४ हजार रुपयांची वीज लागते. ही विजेची गरज सौर ऊर्जेवर भागवता आली आणि अतिरिक्त वीज उरली तर ती शासनाच्या ग्रिडला पुरवून ग्रामीण भागांमधील गरजू शाळांना मोफत देता येऊ शकेल,’ असे ते म्हणाले. या सौर वीज प्रकल्पासाठी ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून निधी गोळा झाल्यावर पुढील ६ महिन्यांत तो पूर्ण होऊ शकेल. माजी विद्यार्थ्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.