News Flash

संस्कृती संवर्धनासाठी राज्य सरकारचा ‘कलांगण’ उपक्रम

परदेशातील ‘स्ट्रीट आर्ट’च्या धर्तीवर राज्यातील कला-संस्कृतीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘कलांगण’ हा उपक्रम राज्य सरकारतर्फे हाती घेतला जात आहे.

| April 18, 2015 03:10 am

परदेशातील ‘स्ट्रीट आर्ट’च्या धर्तीवर राज्यातील कला-संस्कृतीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘कलांगण’ हा उपक्रम राज्य सरकारतर्फे हाती घेतला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर सहा जिल्ह्य़ांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी या उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे.
परदेशात रस्त्यावर कलाकारांतर्फे गायन, वाद्यवादन, चित्र-शिल्प असे कलाविष्कार सादर केले जातात. त्या ठिकाणी अशा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. सांस्कृतिक वैविध्याची खाण असलेल्या महाराष्ट्रामध्ये या कलागुणांचा योग्य वापर केला जात नाही. ही कसर भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी कलांगण उपक्रमाची संकल्पना मांडली. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील सहा जिल्ह्य़ांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये १ मे ते १५ जून या कालावधीमध्ये ‘कलांगण’ उपक्रम राबविला जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांनाच संधी दिली जाणार आहे. दरवेळी नव्या कलाकारांचा समावेश करण्याचा प्रयत्न राहणार असल्याने या उपक्रमाचे वैविध्य अबाधित राहण्यास मदत होईल. कलांगण उपक्रमामुळे राज्यभरातील लोककलावंत, रंगकर्मी, गायक, वादक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध तर होईलच; पण त्याचबरोबरीने पर्यटनासाठीही त्याची मदत होऊ शकेल, अशी माहिती सांस्कृतिक संचालनालयातील सूत्रांनी दिली.
कलांगण उपक्रमाकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांची निवड केली जाणार आहे. पुण्यातील शनिवारवाडा पटांगण, मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. पोलीस आणि लष्करी बँडपथक, समूहगीते, लघुपट, लोककला असे त्याचे नियोजन केले जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 3:10 am

Web Title: kalangan project by state govt for culture growth
Next Stories
1 किडनी विकारावर योगोपचार ठरला प्रभावी
2 ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादी पॅनेलची एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल
3 ‘चौपाटय़ां’साठी नगरसेवकांची ‘अभय योजना’
Just Now!
X