दैवी स्वरांना मिळालेली डोळस तालमीची साथ.. वयाच्या १८ व्या वर्षी बांधलेली पहिली बंदिश.. गायकीतून रागाचा परीघ विस्तारणारे प्रतिभावंत.. नव्या वाटा धुंडाळत रागाच्या त्या अज्ञात प्रदेशाची श्रोत्यांना सफर घडविणारे गायक.. ज्या ज्या गवयांचे जे भावले ते आपल्या गायकीमध्ये सामावून घेणारे.. ऋणानुबंधाने ज्यांच्या स्वरांशी गाठी पडल्या त्या पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीचे पैलू उलगडत कन्या आणि प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांनी रविवारी अभ्यासपूर्ण मैफल रंगविली.
गानवर्धन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे भीमसेन जोशी अध्यासन यांच्यातर्फे आयोजित ‘मुक्त संगीत चर्चासत्रा’मध्ये ‘कुमार गंधर्वाची गायकी’ या विषयावर कलापिनी कोमकली यांच्याशी डॉ. रेखा इनामदार-साने आणि गायक हेमंत पेंडसे यांनी संवाद साधला. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची आणि संजय देशपांडे यांनी तबल्याची साथसंगत केली.
बालवयातील कुमारजींनी गायन केलेला राग आणि गायकी समृद्ध झाल्यावर त्यांनी सादर केलेला तोच राग याविषयीचे श्राव्य ध्वनिमुद्रण रसिकांनी अनुभवले. बालवयातील गायन ऐकल्यावर उस्ताद फैय्याज खाँसाहेबांनी त्यांना शाबासकी दिली होती. ‘मेरे पास जागीर तो नही. लेकिन ये कुबुल कर लो’ असे म्हणत खाँसाहेबांनी डोक्यावरची पगडी काढून कुमारजींच्या डोक्यावर ठेवली होती, ही आठवण कलापिनी कोमकली यांनी सांगितली. राग हा माझा मित्र असेल तर, त्याला मी किती ओळखतो यावर सारे काही अवलंबून आहे. मी जर नीट ओळखत असेन तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मला उलगडता आलेच पाहिजेत, अशी कुमारजींची धारणा होती, असेही त्यांनी सांगितले.
कुमारजींनी अनेक नव्या बंदिशी बांधल्या असल्या तरी परंपरागत बंदिशींवरची त्यांची भक्ती कधी ढळली नाही. रुढार्थाने कुमारजी घराणं मानत नसले तरी ग्वाल्हेर घराण्याचा त्यांना अभिमान होता, असे कलापिनी कोमकली यांनी सांगितले.