िहदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त रविवारी (६ एप्रिल) ‘कालजयी कुमार गंधर्व’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुमार गंधर्व प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र यांच्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘कुमार गायकीचे संस्कार’ या विषयावर सकाळी दहा वाजता होणाऱ्या परिसंवादात आरती अंकलीकर-टिकेकर, मंजिरी आलेगावकर, राजा काळे आणि राहुल देशपांडे यांच्याशी चैतन्य कुंटे संवाद साधणार आहेत. उत्तरार्धात प्रतिष्ठानच्या संग्रहातील पं. कुमार गंधर्व यांच्या १९८० मधील बैठकीच्या दुर्मिळ दृष्यफितीचे विशेष सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसन व्यवस्था असेल.
कुमाक गंधर्व प्रतिष्ठान आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘कालजयी कुमार गंधर्व’ या द्विखंडात्मक संपादित ग्रंथाच्या नोंदणीचा प्रारंभ या निमित्ताने करण्यात येणार आहे. कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या या ग्रंथामध्ये कुमारांच्या निरंतर जाणवत राहणाऱ्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि त्याचा आधार असलेल्या वैचारिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिला खंड मराठीमध्ये असून दुसरा खंड हिंदूी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४५ मान्यवरांचे लेख, कविता आणि मुलाखती यामध्ये समाविष्ट असून प्रसिद्ध गायक आणि विश्लेषकांनी कुमार गायकीचे मर्म उलगडून दाखविले आहेत. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, अविनाश पसरिचा आणि कोमकली कुटुंबीयांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रांचा अंतर्भावही दोन्ही खंडामध्ये करण्यात आला आहे.